नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. आता केवळ २ टप्पे शिल्लक आहेत. त्यातच भाजपाला किती जागा मिळतील याबाबत दावे प्रतिदावे केले जात आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपाला ३७० जागा मिळणार नाहीत परंतु ते ३०३ पेक्षा जास्त जागा जिंकतील असा दावा केला आहे. त्यावर राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी हे कदापि शक्य नाही असं सांगत पीके यांचा दावा खोडून काढला आहे.
योगेंद्र यादव म्हणाले की, मी माझ्या ३५ वर्षाच्या अनुभवावर सांगतो, भाजपाला बहुमत मिळणार नाही. कमीत कमी ५० जागांवर भाजपाचं नुकसान होतंय. भाजपाला २७२ जागा मिळणार नाहीत. प्रशांत किशोर हे निकालांवर विविध मूल्यांकन करत असतात. राम मंदिर मुद्दा नाही, मोदींच्या प्रतिमेला तडा गेलाय असं ते सांगतात तरीही भाजपा ३०३ जागांच्या वर जागा जिंकेल हा त्यांचा दावा विसंगत वाटतो असं त्यांनी म्हटलं.
तसेच अनेक राज्यात भाजपाला नुकसान होत आहे. बिहारमध्ये कमीत कमी १५ जागांहून अधिक नुकसान होतंय. बंगालमध्ये काँग्रेसशी लढत नसली तरी भाजपा आणि टीएमसीमध्ये लढत आहे. तेलंगणामध्येही बीआरएस तितक्या प्रमाणात नजर येत नाही. भाजपाला कुठूनही बहुमत मिळताना दिसत नाही असंही योगेंद्र यादव यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले होते प्रशांत किशोर?
एका मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले की, भाजपा ३७० चा आकडा पार करणार नाही परंतु गेल्यावेळी ज्या ३०३ जागा मिळाल्या होत्या त्या कमी होताना दिसत नाही. बंगाल, आसाम, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळमध्ये भाजपा १५-२० जागांवर विजयी होऊ शकते असा दावा त्यांनी केला. त्याचसोबत विरोधकांनी संधी गमावली हे पहिल्यांदाच घडलं नाही. तर याआधीही मी म्हटलंय, भारतासारख्या देशात जर तुम्ही विरोधात असाल तर तुमच्याकडे प्रत्येक १-२ वर्षांनी संधी येत असते असं किशोर यांनी सांगितले होते.