LokSabha Election: लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही मॅरेथॉन रॅली आणि जाहीर सभा घेत आहेत. अशातच आज संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधान मोदीनी ANI वृत्तसंस्थेला दिलेली एक प्रदीर्घ मुलाखत समोर येणार आहे, ज्यात त्यांनी देशाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची तपशीलवार उत्तरे दिली आहेत.
या मुलाखतीत पीएम मोदींनी राम मंदिरापासून ते सनातन, केंद्रीय तपास यंत्रणा आणि इतर मुद्द्यांवरुन विरोधी पक्षांना चांगलेच धारेवर धरले आहे. तामिळनाडूतील द्रमुक नेत्यांनी सनातनवर अनेक विधाने केली, यावर पीएम मोदी म्हणाले की, द्रमुकचा जन्म केवळ द्वेषपूर्ण विधाने करण्यासाठी झाला आहे. द्रमुकविरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे मतदार आता भाजपकडे वळत आहेत. काँग्रेसने द्रमुकला विचारले पाहिजे की, त्यांची एवढी कोणती मजबुरी आहे, ज्यामुळे ते सातत्याने सनातन धर्माचा अपमान करत आहेत.
राम मंदिर विरोधकांचे राजकीय हत्यार त्याचवेळी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला की, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे राजकारण व्हायला नको होते, पण ते झाले. यावर मोदी म्हणाले की, रा मंदिर त्यांच्यासाठी (काँग्रेस) राजकीय शस्त्र आहे. रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याच्या मुद्द्यावरही पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना पीएम मोदी म्हणाले की, दोन्ही राष्ट्रपतींसोबत माझे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तिथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी मी त्यांची मदत मागितली.
निवडणूक रोखे रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलताना मोदी म्हणाले की, इलेक्टोरल बाँड्समुळेच तुम्हाला पैसे कुठून आले, कोणत्या कंपनीने दिली? त्यांनी ते कसे दिले? त्यांनी ते कुठे दिले? या सर्वांची माहिती मिळत आहे. म्हणूनच मी म्हणतो की, विरोधकांनी प्रामाणिकपणे विचार केल्यावर त्यांना सर्वाधिक पश्चाताप होईल.
दरम्यान, पंतप्रधानांनी यावेळी इलेक्टोरल बाँड्स, ईडी-सीबीआय-आयटी, या सर्व एजन्सींवर भाजपचे वर्चस्व असल्याची विरोधकांची टीका. यासह इतर अनेक प्रश्नांची पीएम मोदींनी चोख उत्तर दिली आहेत. पीएम मोदींची संपूर्ण मुलाखत संध्याकाळी 5.30 वाजता प्रसारित होणार आहे.