नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालं आहे. 2014 च्या तुलनेत नरेंद्र मोदी यांना प्रचंड प्रमाणात बहुमत लोकांनी दिलं आहे. भाजपा स्वबळावर 300 चा आकडा पार करत आहे. सलग दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर बसणार आहेत. येत्या 26 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होईल असं सांगितलं जात आहे. मात्र 26 मे का? याबाबत अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे.
26 हा आकडा पाहिला तर 2-6 = 8 हा आकडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी शुभ मानला जातो. अंकशास्त्रानुसार 26 मे या अंकाला जोडलं तर त्याची बेरीज 8 होते. 26 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. 26 मे रोजी मागच्यावेळी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. सर्वात विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जन्मतारीख 17 सप्टेंबर आहे. 17 आकड्याची बेरीजही 8 होते.
सतराव्या लोकसभेचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत हाती आलेले कल आणि काही निकालांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने 340 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपानेही स्वबळावर 300 पार मजल मारण्याच्या दिशेने कूच केली आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएची पुन्हा एकदा दाणादाण उडाली असून, काँग्रेस आणि मित्रपक्ष 90 हून अधिक जागांवर आघाडीवर आहेत. तर इतर पक्ष 110 जागांवर आघाडीवर आहेत.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच भाजपा आणि मित्रपक्षांनी आघाडी घेतली होती. मतमोजणीला सुरुवात होऊन नऊ तास उलटले असून, भाजपा आणि मित्रपक्षांची आघाडी 340 हून अधिक जागांपर्यंत पोहोचली आहे. दक्षिण भारत वगळता देशातील सर्वच भागातून भाजपा आणि मित्रपक्षांना जोरदार समर्थन मिळाले आहे.
महाआघाडीने कडवे आव्हान उभे केलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने आपले वर्चस्व राखले असून, उत्तर प्रदेशात 58 हून अधिक जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. बिहारमध्येही भाजपा आणि मित्रपक्ष 36 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाराष्ट्रामध्ये 41 जागांवर शिवसेना भाजपा युती आघाडीवर आहे.
या विजयावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींही प्रतिक्रिया दिली आहे. सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत, असं मोदी ट्विट करत म्हणाले आहेत. एकत्र विकास करू, एकत्र उन्नती करू, एक मजबूत आणि सर्वसमावेशक भारत तयार करू, अशी आशाही मोदींनी व्यक्त केली आहे.