नवी दिल्ली - देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार बनणार आहे. आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या खासदारांची बैठक झाली. या बैठकीत सभागृह नेते म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची एकमताने निवड करण्यात आली. राजनाथ सिंह यांनी मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यावर सर्व दलाच्या नेत्यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर नरेंद्र मोदींनी भाजपासह एनडीएच्या घटक पक्षांच्या नवनियुक्त खासदारांना संबोधित केले.
सेंट्रल हॉलमधील कार्यक्रम झाल्यानंतर नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने गेले. त्याठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत सरकार बनवण्याचा दावा सांगितला. त्यावेळी मोदींसोबत एकनाथ शिंदे, अजित पवारांसह घटक एनडीएचे १५ नेते उपस्थित होते. त्यात राजनाथ सिंह, अमित शाह, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, प्रफुल पटेल, सुदेश महतो, अनुप्रिया पटेल, एचडी कुमारस्वामी आणि चिराग पासवान यांचा समावेश होता. सूत्रांनुसार, ९ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील.
नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
सेट्रंल हॉल इथं नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ४ जूनला लोकशाहीला घेरण्याची तयारी केली होती. आता ५ वर्ष ईव्हीएमबाबत बोलणार नाहीत. विरोधक नैराश्याच्या भावनेने मैदानात उतरले होते. काँग्रेसला मागील ३ निवडणुका मिळून जितक्या जागा मिळाल्या नाहीत तितक्या आम्हाला या निवडणुकीत मिळाल्या. १० वर्षानंतरही काँग्रेसला १०० चा आकडा गाठता आला नाही. आम्हाला विजयाचा उन्माद नाही. ना आम्ही हरलो होतो, ना आता हरलो आहे असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, आम्ही गुड गवर्नेंसचा नवा अध्याय लिहणार आहोत. विकसित भारताचं स्वप्न साकार करणार आहोत. देशाला फक्त आणि फक्त एनडीएवर भरवसा आहे. आज देशाचा एनडीएवर विश्वास असल्याने स्वाभाविकपणे त्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. मी आधीही सांगितलं, मागील १० वर्ष ट्रेलर होता आणि हे माझे कमिटमेंट आहे. आम्ही आणखी वेगाने देशाचा विकास करू. विरोधकांनी भ्रम आणि खोटं पसरवलं. लोकांची दिशाभूल केली. विरोधकांनी भारताला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं असा आरोप नरेंद्र मोदींनी विरोधकांवर केला.