२०१ जागांवर १००० चे मताधिक्य; भाजपाच्या १०७, कोणत्याही क्षणी पारडे फिरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 11:58 AM2024-06-04T11:58:19+5:302024-06-04T11:58:48+5:30
Loksabha Election Result 2024 Update: अनेक जागा अशा आहेत जिथे भाजपा १००० च्या आसपासच्या मतांनी आघाडी आहे. या जागा केव्हाही पारडे फिरवू शकतील अशी परिस्थिती आहे.
यंदाची लोकसभा निवडणूक चुरशीची होताना दिसत आहे. भाजपाला आजवर साथ दिलेल्या राज्यांनी यंदा विरोधकांना साथ दिल्याचे चित्र आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांमध्ये भाजपाला मोठा धक्का बसताना दिसत आहे. देशभरात एनडीए २९० जागांवर तर इंडिया आघाडी २३४ जागांवर आघाडीवर आहे. परंतु यापैकी अनेक जागा अशा आहेत जिथे भाजपा १००० च्या आसपासच्या मतांनी आघाडी आहे. या जागा केव्हाही पारडे फिरवू शकतील अशी परिस्थिती आहे.
५४२ पैकी २०१ जागांवरील मताधिक्य हे १००० मतांच्या आसपासचे आहे. यापैकी १०७ जागांवर एनडीए आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी ८३ जागांवर आघाडीवर आहे. ११ जागांवर इतर आघाडीवर आहेत. उमेदवारांमधील हा कमी फरक कोणत्याही क्षणी पारडे फिरवू शकतो.
हेवीवेट फाईटमध्ये नारायण राणे, नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आघाडीवर आहेत. तर स्मृती इराणी, नवनीत राणा, मेनका गांधी आदी पिछाडीवर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सपाने भाजपाला जोरदार टक्कर दिलेली आहे. बिहारमध्ये जदयू १२, भाजपा १०, राजद ५ आणि काँग्रेसला २ जागांवर आघाडी मिळाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी आघाडी घेतली असून त्यांचा पक्ष टीएमसी २२ जागांवर आघाडीवर आहे. भाजप पाच आणि काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे. पंजाबमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये टक्कर असून काँग्रेस 6 जागांवर आघाडीवर. आम आदमी पार्टीही 2 जागांवर पुढे आहे. तर शिरोमणी अकाली दलही दोन जागांवर आघाडीवर आहे. भाजपाच्या खात्यात शून्य जागा जाताना दिसत आहेत.