Loksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये अनेक जागांवर एनडीए (NDA) आणि इंडिया आघाडी (INDIA) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. तर काही राज्ये अशी आहेत ज्यांनी भाजपला टेन्शन दिलंय. देशातील सर्वात मोठे राजकीय राज्य यूपीमध्ये सुरुवातीच्या कलांत भाजपच्या पायाखालची जमीन सरकल्याचं दिसून येतंय. कलांमध्ये एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी इंडिया आघाडी एनडीएला कडवं आव्हान देत आहे. या निवडणुकीत काँग्रेससाठी ही दिलासादायक बातमीही समोर येतेय. काँग्रेसच्या जागा १०० च्या पुढे जाताना दिसत आहेत.
उत्तर प्रदेश : ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेश राज्यात यंदा राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची जोडी भाजपला कडवी टक्कर देताना दिसत आहे. भाजपला या राज्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार सपा भाजपपेक्षा पुढे दिसत आहे. सपा ३६ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप ३२ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर आहे. अमेठी, मैनपूर आणि रायबरेली मतदारसंघात भाजप पिछाडीवर आहे. तसं पाहिलं तर सर्वात मोठी उलथापालथ सध्या इथेच होताना दिसत आहे. गेल्या वेळी भाजपला येथे ६२ जागा मिळाल्या होत्या, पण यंदा या आकड्यापेक्षा ते खूपच मागे आहेत.
महाराष्ट्र : दुसरं राज्य महाराष्ट्र जिथे भाजपने अनेक प्रयोग केले आहेत, पण या ट्रेंडचा अद्याप काहीही फायदा होताना दिसत नाही. महाराष्ट्रात एनडीएचे उमेदवार २५ जागांवर आघाडीवर आहेत, तर इंडिया आघाडीचे उमेदवार २१ जागांवर आघाडीवर आहेत. तर दोन जागांवर इतर पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
राजस्थान : तिसरं राज्य राजस्थान जिथे गेल्या वेळी भाजपला क्लीन स्वीप मिळालं होतं, पण यावेळी कडवी झुंज पाहायला मिळत आहे. भाजप १३ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे.
हरयाणा : या राज्यातूनही भाजपसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. भाजप ६ जागांवर आघाडीवर आहे. गेल्या वेळी सर्व जागांवर भाजपला विजय मिळाला होता. काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर आहे.
पश्चिम बंगाल : पाचवं राज्य पश्चिम बंगाल. जिथे भाजपला मोठ्या अपेक्षा होत्या, पण एक्झिट पोलप्रमाणे इथून निकाल येत नाहीत. काँग्रेस २१ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप १५ जागांवर आघाडीवर आहे.