नवी दिल्ली - ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी मोठा दावा केला आहे. भाजपाचे ३ खासदार टीएमसीच्या संपर्कात असून लवकरच भाजपाची लोकसभेतील संख्या २३७ इतकी होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीत भाजपानं २४० जागा जिंकल्या होत्या. टीडीपी आणि जेडीयू या घटक पक्षांसोबत एनडीएनं बहुमत मिळवल्यानं नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले.
यंदाच्या निवडणुकीत भाजपाला स्वबळावर बहुमत मिळालं नाही. त्यामुळे जर ३ खासदारांनी वेगळी भूमिका घेतली तर भाजपाचं लोकसभेतील संख्याबळ कमी होऊ शकतं. मात्र टीएमसीनं केलेला दावा चुकीचा असून आमचे सर्व खासदार एकत्र आहेत असं प्रत्युत्तर भाजपानं दिलं आहे. लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं राज्यातील ४२ पैकी २९ जागांवर विजय मिळवला तर भाजपाची २०१९ संख्या १८ खासदारावरून यंदा १२ खासदार निवडून आलेत.
टीएमसीचे राज्यसभेचे खासदार साकेत गोखले यांनी म्हटलं की, सध्या भाजपाकडे लोकसभेत २४० जागा आहेत तर इंडिया आघाडीकडे २३७ जागा आहे. पश्चिम बंगालमधील भाजपाचे ३ खासदार आमच्या संपर्कात आहेत. लवकरच एक सुखद धक्का मिळेल. यामुळे भाजपाचे संख्याबळ २३७ खासदारांपर्यंत राहील तर इंडिया आघाडीच्या खासदारांची संख्या २४० इतकी होईल असा दावा त्यांनी केला आहे.
तसेच नरेंद्र मोदी यांनी बनवलेली आघाडी टिकणार नाही. ती जास्त दिवस राहणार नाही असंही त्यांनी सांगितले. अलीकडच्या निवडणुकीत भाजपाला २४० जागा मिळाल्यात. त्यामुळे बहुमतासाठी लागणाऱ्या २७२ चा आकडा गाठण्यासाठी भाजपाला ३२ खासदारांची गरज आहे. एनडीएच्या घटक पक्षांना सोबत घेत भाजपानं २९३ चा आकडा गाठला आहे. काँग्रेसनं या निवडणुकीत ९९ खासदार जिंकलेत तर २ अपक्ष उमेदवारांनी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची संख्या २३६ इतकी झाली आहे.
टीएमसीचा दावा भाजपानं खोडला
तृणमूल काँग्रेस स्वप्नात जगतेय. २०१४ पासून तृणमूल केंद्रात सरकार बनवण्याचं स्वप्न पाहतेय परंतु तिसऱ्यांदा त्यांचं स्वप्न भंगलं आहे. बंगालमधील कुठलाही खासदार टीएमसीच्या संपर्कात नाही. भाजपा खासदार पक्षासोबत एकत्र आहेत असं सांगत टीएमसीने केलेला दावा भाजपा प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी खोडला आहे.