नवी दिल्ली - नरेंद्र मोदी अवघ्या काही तासांत म्हणजे ९ जूनला संध्याकाळी ७.१५ वाजता तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला शेजारील राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होतील. हा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात होईल. तिथे सर्व तयारी पूर्ण झाली आहे. शपथविधी सोहळ्यानिमित्त राजधानी दिल्लीला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे.
शपथविधी सोहळ्याला परदेशी पाहुणे येणार असल्याने त्यांची सुरक्षा पाहता संसद भवन, राष्ट्रपती भवन, नॉर्थ साऊथ ब्लॉक परिसरात कमांडो आणि पोलीस जवान तैनात आहेत. पीटीआय वृत्तानुसार, सुरक्षा प्रोटोकॉलचा एक भाग म्हणून सुरक्षा अधिकारी राष्ट्रपती भवनाच्या आत आणि बाहेर त्रिस्तरीय सुरक्षा असेल. राष्ट्रपती भवनाच्या रिंगबाहेर दिल्ली पोलीस तैनात राहतील तर इनर रिंगमध्ये अर्धसैनिक दलाचे जवान बंदोबस्ताला असतील. अर्धसैनिक दलाच्या ५ तुकड्या आणि दिल्ली सशस्त्र पोलीस जवान यासह जवळपास २५०० पोलीस कर्मचारी कार्यक्रमस्थळी सुरक्षेसाठी तैनात केले जाणार आहेत.
शपथग्रहणाच्या त्रिस्तरीय सुरक्षेशिवाय परदेशी पाहुणे आणि नेत्यांसाठीही सुरक्षेची चोख व्यवस्था आहे. ज्या रस्त्यांवरून व्हिव्हिआयपी ताफा जाईल त्या रस्त्यावर स्नाइपर्स, सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात आहेत. याशिवाय ठिकठिकाणी ड्रोनद्वारे पाहणी केली जाणार आहे. दिल्ली पोलिसांनी राजधानीत आधीच नो फ्लाईंग झोन घोषित केला आहे. ९ ते ११ तारखेपर्यंत हे लागू असेल.
दिल्लीत पॅराग्लाइडर, हँग ग्लाइडर, यूवी, यूएएस, माइक्रोलाइट विमानाच्या उड्डाणावर बंदी आहे. शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांना ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले आहे तिथेही सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. हॉटेलची सुरक्षा पाहुण्यांच्या प्रोटोकॉलनुसार अपडेट केली जात आहे. शपथविधी सोहळ्याला परदेशी पाहुण्यांसह विविध धर्मातील ५० धार्मिक नेतेही उपस्थित राहतील. त्याशिवाय वकील, डॉक्टर, कलाकार, प्रभावशाली व्यक्तीसह अनेक लोकांना निमंत्रित करण्यात आलं आहे. पद्मविभूषण, पद्मभूषणसारखे पुरस्कार प्राप्त मान्यवरही सोहळ्याला उपस्थित राहतील.
शपथविधी सोहळ्याला कोण हजर राहणार?
शपथविधी सोहळ्यासाठी बांग्लादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशसचे राष्ट्राध्यक्षासह प्रमुख नेते उपस्थित राहतील. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकाचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि काही अन्य देशाच्या नेत्यांना आधीच निमंत्रण मिळालं आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.