नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल आता स्पष्ट होऊ लागले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीच्या निकालांमध्ये ५४३ जागांपैकी २०० हून अधिक जागांवर इंडिया आघाडी पुढे आहे. त्यात प्रामुख्याने सर्वात जुना आणि मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने १५० जागांपर्यंत आघाडी घेतली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचा प्रयोग काँग्रेसला फायदेशीर ठरल्याचं दिसून येत आहे.
मागील २ निवडणुकांचे निकाल पाहिले तर सातत्याने काँग्रेसची कामगिरी ढासळत होती. २०१४ च्या मोदी लाटेत अवघ्या ४४ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले तर २०१९ च्या निवडणुकीत हा आकडा ५२ पर्यंत गेला. मागील निवडणुकीत ज्या राज्यात काँग्रेसनं चांगले यश मिळवलं त्या राज्यासह उत्तरेकडील काही राज्यात काँग्रेस मोठी अपेक्षा ठेवून आहे. मागच्या निवडणुकीत उत्तरेकडील राज्यात काँग्रेस केवळ १-२ जागांवर विजयी झाली होती. त्याठिकाणी यंदा जागा वाढतील असा कल निवडणूक निकालावरून दिसून येत आहे. काँग्रेसनं पहिल्यांदाच त्यांच्या राजकीय इतिहासात ३२७ इतक्या कमी जागांवर निवडणूक लढवली आहे. मात्र कमी जागा लढवून काँग्रेस सुरुवातीच्या कलांमध्ये १५० जागांवर आघाडी असल्याचं दिसून येत आहे.
उत्तरेकडे काँग्रेसला आशावाद
काँग्रेसची नजर यावेळी अशा राज्यांवर आहे जिथं मागील निवडणुकीत त्यांना विजयाचं खाते उघडता आले नाही. गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसारख्या राज्यात मागील २ निवडणुकीत काँग्रेसला फटका बसला. तर छत्तीसगड, हरियाणा, मध्य प्रदेश, यूपी आणि महाराष्ट्र याठिकाणी काँग्रेस केवळ १-२ जागांवर जिंकली. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, हरियाणा आणि छत्तीसगड या राज्यांकडून काँग्रेसला मोठी अपेक्षा आहे.
काँग्रेसची रणनीती यशस्वी होण्याचं चित्र
काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत चांगल्या निकालाची अपेक्षा आहे. महागाई, बेरोजगारी, संविधान वाचवण्याची लढाई यासारख्या मुद्द्यावर काँग्रेसनं जनतेत जात मते मागितली. त्यात महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणणार असल्याचं सांगत त्यातून महिलांना दरमहा ८५०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे या योजनेचा फायदाही काँग्रेसला होताना दिसत आहे. लोकांशी निगडीत मुद्द्यापासून प्रचार कुठेही भरकटला जाऊ नये यासाठी काँग्रेसनं काळजी घेतली. सुरुवातीपासून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी पक्षांवर आक्रमक प्रचार सुरू होता. काँग्रेसनं प्रसिद्ध केलेला जाहिरनामा आणि त्यातील ५ सामाजिक न्याय आणि २५ गॅरंटी यावरून ते जनतेत गेले. त्यामुळे काँग्रेसला आत्मविश्वास वाढला. त्यातूनच याचे निकालात पडसाद दिसताना पाहायला मिळत आहे.
खटाखट....
राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या प्रचारात खटाखट शब्दाचा वारंवार वापर केलेला पाहायला मिळाला. इंडिया आघाडीचं सरकार बनताच आम्ही पहिल्या महिन्यापासून खटाखट गरीब महिलांच्या खात्यावर ८५०० रुपये महिन्याला टाकणार. त्यामुळे या आश्वासनामुळे मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या जागांमध्येही खटाखट वाढ होताना दिसत आहे.