नवी दिल्ली - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १७ वी लोकसभा भंग केल्यानंतर आता देशात पुन्हा सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला पुन्हा बहुमत मिळालं आहे. त्यात भाजपानं सर्वाधिक २४० जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे एनडीएकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. दिल्लीत आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
बैठकीत खालील प्रस्ताव पारित करण्यात आला
भारताच्या १४० कोटी जनतेनं गेल्या १० वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमधील जनकल्याणकारी योजनेतून देशातील प्रत्येक भागात विकास होताना पाहिला आहे. दिर्घकाळापासून जवळपास ६ दशकानंतर भारतातील जनतेने सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सशक्त नेतृत्व निवडलं आहे.
२०२४ ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित लढले आणि जिंकले याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही सर्व एनडीएचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांनी सर्वसमंतीने निवड करत आहोत.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार भारतातील गरीब, महिला, युवा आणि शेतकरी, शोषित, वंचित आणि पीडित नागरिकांना सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. भारताच्या वारसाचं रक्षण करण्यासाठी देशाच्या सर्वागिण विकासासाठी एनडीए सरकार भारताच्या जनतेतील आयुष्यात सुधार आणण्यासाठी प्रयत्नशील राहील.
हा प्रस्ताव सर्वसमंतीने दिनांक ५ जून २०२४ रोजी नवी दिल्लीत मंजूर करण्यात आला.
प्रस्तावावर २१ नेत्यांची स्वाक्षरी
NDA घटक पक्षांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची सर्वसमंतीने नेतेपदी निवड केली आहे. बुधवारी पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावर २१ नेत्यांची स्वाक्षरी आहे. त्यात टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू, जेडीयूचे प्रमुख नीतीश कुमार यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे.
आजच सरकार स्थापनेचा दावा करणार?
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज रात्री ७.४५ मिनिटांनी एनडीएचे घटक पक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. आज राष्ट्रपती भवनात डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या राष्ट्रपतींसोबतच्या बैठकीत एनडीए सरकार स्थापनेचा दावा करू शकते. दरम्यान, एनडीएच्या सर्व खासदारांना ७ जून रोजी राष्ट्रपतींसोबत भेट करण्याची संधी मिळणार आहे.