Loksabha Election Result: यशस्वी कामगिरी! मोदी लाटेत ज्या राज्यात उडाला धुव्वा, तिथेच काँग्रेस बनली हिरो
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 11:24 AM2024-06-04T11:24:55+5:302024-06-04T11:26:01+5:30
Lok Sabha Election 2024 Highlights - उत्तरेकडील अनेक राज्यात काँग्रेस सुरुवातीच्या कलांमध्ये पुढे असल्याचं दिसून येत आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा काँग्रेसला या राज्यांत चांगले यश मिळताना दिसून येत आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक निकालाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. एनडीए २८८ जागांवर आघाडी आहे ज्यात भाजपा २४० जागांवर पुढे आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीही चांगली कामगिरी करताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये इंडिया आघाडीनेही २०० जागांवर आघाडी घेतली आहे. त्यात काँग्रेस जबरदस्त कामगिरी करताना दिसतेय.
सुरुवातीच्या कलांमध्ये अनेक राज्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर दिसून येते. ज्यात राजस्थानाचाही समावेश आहे. राजस्थानच्या २५ लोकसभा जागांवर भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. त्यात काँग्रेस १३ जागांवर आघाडी आहे तर भाजपा १२ जागांवर पुढे आहे.
राजस्थानात मोठी उलथापालथ
राजस्थानचे ट्रेंड पाहिले तर त्यात भाजपाला मोठा झटका दिसताना पाहायला मिळत आहे. मागील निवडणुकीत भाजपाने या राज्यात २५ पैकी २४ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला खातेही उघडता आलं नव्हते. परंतु यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं बाजी पलटली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस भाजपापुढेही गेली आहे.
० ते १३ जागांवर काँग्रेस
गेल्या निवडणुकीत राजस्थानात मोदी लाटेत काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता. २०१४ मध्ये पक्षाला एकही जागा मिळाली नाही. २०१९ च्या निवडणुकीत ३४.२२ टक्के मते काँग्रेसने घेतली परंतु एकाही जागेवर विजय मिळाला नाही. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस चांगली कामगिरी करताना दिसत आहे.
महाराष्ट्रातही काँग्रेसला मोठं यश
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. २०१४ मध्ये नांदेड मतदारसंघातून अशोक चव्हाण विजयी झाले होते तर २०१९ च्या निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघात बाळू धानोरकर खासदार झाले होते. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून १७ जागांवर निवडणूक लढवली आहे. त्यातील १० जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही काँग्रेसला मोठं यश मिळताना दिसत आहे.
दरम्यान, या निवडणुकीच्या निकालांमध्ये ५४३ जागांपैकी २०० हून अधिक जागांवर इंडिया आघाडी पुढे आहे. त्यात प्रामुख्याने सर्वात जुना आणि मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने १५० जागांपर्यंत आघाडी घेतली आहे. इंडिया आघाडीचा प्रयोग काँग्रेसला फायदेशीर ठरल्याचं दिसून येत आहे.