नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर यामध्ये कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. २०२४ च्या निकालात भाजपाला २४० जागांवर समाधान मानावं लागलं आहे. बहुमतापासून भाजपाला ३२ जागांनी दूर आहे. मात्र भाजपा प्रणित एनडीएला बहुमत मिळाल्याने पुन्हा इकदा देशात एनडीए सरकार बनण्याचा मार्ग मोकळा आहे. परंतु मोदी ३.० सरकारमध्ये भाजपाला मित्रपक्षांना मोठा वाटा द्यावा लागणार आहे. प्रत्येकी ४ खासदारांमागे एक मंत्रिपद असं हे सूत्र ठरल्याची बातमी पुढे आली आहे.
नितीश कुमार यांच्या जेडीयूला ३ मंत्रिपदे, चिराग पासवान यांना १ कॅबिनेट मंत्रिपद, जितनराम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चाला १ मंत्रिपद, चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला ४ कॅबिनेट मंत्रिपदे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्रिपद मिळणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ कॅबिनेट मंत्रिपद, अनुप्रिया पटेल यांच्या अपना दलला १ मंत्रिपद तर जयंत चौधरी यांच्या पक्षाला १ मंत्रिपद आणि पवन कल्याण यांच्या जनसेनेला १ मंत्रिपद देणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपा एनडीए सरकारमध्ये महत्त्वाची ४ खाती स्वत:कडे ठेवणार आहे.
भाजपा स्वत:कडे गृह, वित्त आणि संरक्षण मंत्रालयासह आणखी एक महत्त्वाचे खाते ठेवणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या तीन राज्यांना डोळ्यासमोर ठेवून महत्त्वाची खाती या राज्यांना दिली जाणार आहेत. एनडीएच्या वाटाघाटीत लोकसभा अध्यक्षपद, अर्थ, गृह आणि रेल्वे मंत्रालयात या खात्यावरून रस्सीखेच सुरू आहे. मात्र गृह आणि अर्थ खाते भाजपा सोडणार नाही. रेल्वे खाते मित्रपक्षांना दिले जाऊ शकते. नितीश कुमार यांनी रेल्वे मंत्रालयासाठी आग्रह धरलेला आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्याला रेल्वे मंत्रालय जाते का हे पाहणं गरजेचे आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणूक निकालात गेल्या वेळीच्या तुलनेत भाजपाची पिछेहाट झाल्याचं पाहून एनडीएतील घटक पक्षांच्या मागणीत वाढ झाली आहे. प्रत्येक पक्ष अधिकची मंत्रिपदे मागत आहे. एनडीएला २९३ जागांसह बहुमत मिळालं आहे. त्यात भाजपाला २४० जागा, तेलुगु देसम पार्टीला १६ आणि जनता दल यूनाइटेडला १२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे जेडीयू आणि टीडीपी हे किंगमेकर बनले आहेत.