जनादेश INDIA आघाडीच्या बाजूने नाही; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 10:07 PM2024-06-05T22:07:17+5:302024-06-05T22:08:06+5:30
loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला स्पष्ट बहुमत असलं तरी नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना सोबत आणण्यासाठी इंडिया आघाडी प्रयत्नशील आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दिल्लीत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झालेत. त्यात विरोधी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडली. याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी मोठं विधान केले आहे. देशातील जनादेश इंडिया आघाडीच्या बाजूने नाही. काँग्रेसनं कधीही एकटे सरकार बनवणार असं म्हटलं नव्हतं. घटक पक्षांना सोबत घेत पुढे जाऊ असं काँग्रेस सांगत होती असं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नेते सातत्याने लोकसभेच्या निकालात भाजपाचा पराभव झालाय असं चित्र तयार करत आहेत. परंतु भाजपाला २४० जागा मिळाल्या तर एनडीएला २९२ जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीकडे एकूण मिळून २३४ जागा आहेत. इंडिया आघाडीत सहभागी सर्व पक्षांच्या जागा मिळून भाजपाच्या मागे आहेत. त्यानंतरही काँग्रेससह विरोधी पक्षातील नेते भाजपाचा पराभव झाला असल्याचं सांगत आहेत. त्यावर अभिषेक मनु सिंघवींना प्रश्न विचारण्यात आला होता. न्यूज १८ ने त्यांची मुलाखत घेतली.
त्यावर अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील जनादेश हा इंडिया आघाडीच्या बाजूने नाही. काँग्रेसनं कधीही स्वबळावर सरकार बनवू असं म्हटलं नाही. सुरुवातीपासून सहकारी पक्षांना सोबत घेऊन सरकार बनवू असं काँग्रेसनं म्हटलं होतं असं त्यांनी सांगितले.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?
लोकसभा निवडणुकीचे निकाल सर्वांसाठी आश्चर्यकारक आहेत. भाजपाला गेल्या २ टर्मला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. परंतु यंदा पक्षाला मोठा फटका बसला आहे. भाजपाला यंदा २४० जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दुसरीकडे ते बहुमतापासून ३२ जागा दूर आहेत. एनडीएला एकूण मिळून २९२ जागा आल्यात. काँग्रेस सातत्याने तिसऱ्यांदा तिहेरी आकडा गाठू शकली नाही. काँग्रेसला देशात ९९ जागा मिळाल्या आहेत. इंडिया आघाडीला एकूण मिळून २३४ जागा मिळाल्या आहेत.