...तर INDIA आघाडीनं आणखी ९ जागा जिंकल्या असत्या; महाराष्ट्रातील ४ जागांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 05:04 PM2024-06-08T17:04:53+5:302024-06-08T17:05:51+5:30

loksabha Election Result - यंदाच्या लोकसभेत असे अनेक छोटे पक्ष होते, ज्यांनी ना एनडीएला पाठिंबा दिला, ना इंडिया आघाडीत सहभागी झाले. या पक्षांमुळे इंडिया आघाडीचं मात्र ९ जागांवर नुकसान झालं. 

Loksabha Election Result -...then the INDIA alliance would have won 9 more seats; Including 4 constituencies in Maharashtra | ...तर INDIA आघाडीनं आणखी ९ जागा जिंकल्या असत्या; महाराष्ट्रातील ४ जागांचा समावेश

...तर INDIA आघाडीनं आणखी ९ जागा जिंकल्या असत्या; महाराष्ट्रातील ४ जागांचा समावेश

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीनं एक्झिट पोलचे आकडे खोटे ठरवत जोरदार मुसंडी मारली. भलेही ते बहुमताच्या आकड्यापासून दूर असले तरीही विरोधकांच्या या कामगिरीनं सत्ताधारी भाजपाची दमछाक केली. आकड्यांचा विचार केला तर आणखी ९ जागा विरोधक सहज जिंकले असते कारण याठिकाणी अत्यंत कमी मताधिक्य होते.

विरोधक कमीत कमी ९ जागा आणखी जिंकू शकले असते कारण या मतदारसंघात विरोधकांच्या गाडीला तिसऱ्या पक्षांनी ब्रेक लावला. भाजपाविरोधी मते यात विभागली गेली त्यामुळे त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला आणि इंडिया आघाडीच्या पक्षांना पराभव सहन करावा लागला. 

वंचित बहुजन आघाडी सोबत असती तर...

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात एकही जागा जिंकली नाही. परंतु कमीत कमी चार अशा जागा आहेत जिथे भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांना त्याचा फायदा झाला. वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांचा विचार केला तर अकोला, बुलढाणा, हातकणंगले आणि मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना जिंकण्याची संधी होती. 

मुंबई उत्तर पश्चिम - मताधिक्य - ४८ - वंचितला मिळालेली मते - १००५२
हातकणंगले - मताधिक्य - १३४२६ - वंचितला मिळालेली मते - ३२६९६
बुलढाणा - मताधिक्य २९४७९ - वंचितला मिळालेली मते - ९८४४१
अकोला - मताधिक्य ४०६२६ - वंचितला मिळालेली मते - २७६७४७

बहुजन समाज पार्टीमुळेही इंडिया आघाडीला ३ जागांवर फटका

जयपूर ग्रामीण ( राजस्थान ) - मताधिक्य १६१५ - बसपाला मिळालेली मते - ३८५०
कांकेर ( छत्तीसगड ) - मताधिक्य १८८४ - बसपाला मिळालेली मते - ११७७०
मोरेना ( मध्य प्रदेश ) मताधिक्य ५२५३० - बसपाला मिळालेली मते - १७९६६९

AIDUF या छोट्या पक्षामुळे एका जागेवर नुकसान 

करीमगंज ( आसाम ) - मताधिक्य १८३६० - All India United Democratic Front ची मते - २९२०५

इंडियन नॅशनल लोक दलानेही एका जागेवर फटका

कुरुक्षेत्र ( हरियाणा )  - मताधिक्य २९०२१ - INLD पक्षाला मिळालेली मते ७८७०८ 


मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात विजय मिळवणारी शिवसेना आणि दुसऱ्या नंबरवर उबाठा यांच्यात मताधिक्य केवळ ४८ मतांचे आहे. याठिकाणी वंचित बहुजन आघाडीने १० हजारपेक्षा अधिक मते मिळवली आहेत ज्याचा फायदा इंडिया आघाडीला झाला असता. हातकणंगले येथेही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १३४२६ मतांनी पराभूत व्हावे लागले आहे. त्याठिकाणी वंचितला ३२ हजार ६९६ मते मिळाली आहेत. 

अकोला येथे काँग्रेस उमेदवाराला भाजपानं ४० हजार ६२६ मतांनी हरवलं आहे. तिथे प्रकाश आंबेडकर हे स्वत: उभे होते. या मतदारसंघात वंचितला २ लाख ७७ हजार मते पडली. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील होती. मात्र ६ जागांच्या मागणीमुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकली नाही. 
 

Web Title: Loksabha Election Result -...then the INDIA alliance would have won 9 more seats; Including 4 constituencies in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.