नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीनं एक्झिट पोलचे आकडे खोटे ठरवत जोरदार मुसंडी मारली. भलेही ते बहुमताच्या आकड्यापासून दूर असले तरीही विरोधकांच्या या कामगिरीनं सत्ताधारी भाजपाची दमछाक केली. आकड्यांचा विचार केला तर आणखी ९ जागा विरोधक सहज जिंकले असते कारण याठिकाणी अत्यंत कमी मताधिक्य होते.
विरोधक कमीत कमी ९ जागा आणखी जिंकू शकले असते कारण या मतदारसंघात विरोधकांच्या गाडीला तिसऱ्या पक्षांनी ब्रेक लावला. भाजपाविरोधी मते यात विभागली गेली त्यामुळे त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला आणि इंडिया आघाडीच्या पक्षांना पराभव सहन करावा लागला.
वंचित बहुजन आघाडी सोबत असती तर...
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात एकही जागा जिंकली नाही. परंतु कमीत कमी चार अशा जागा आहेत जिथे भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांना त्याचा फायदा झाला. वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांचा विचार केला तर अकोला, बुलढाणा, हातकणंगले आणि मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना जिंकण्याची संधी होती.
मुंबई उत्तर पश्चिम - मताधिक्य - ४८ - वंचितला मिळालेली मते - १००५२हातकणंगले - मताधिक्य - १३४२६ - वंचितला मिळालेली मते - ३२६९६बुलढाणा - मताधिक्य २९४७९ - वंचितला मिळालेली मते - ९८४४१अकोला - मताधिक्य ४०६२६ - वंचितला मिळालेली मते - २७६७४७
बहुजन समाज पार्टीमुळेही इंडिया आघाडीला ३ जागांवर फटका
जयपूर ग्रामीण ( राजस्थान ) - मताधिक्य १६१५ - बसपाला मिळालेली मते - ३८५०कांकेर ( छत्तीसगड ) - मताधिक्य १८८४ - बसपाला मिळालेली मते - ११७७०मोरेना ( मध्य प्रदेश ) मताधिक्य ५२५३० - बसपाला मिळालेली मते - १७९६६९
AIDUF या छोट्या पक्षामुळे एका जागेवर नुकसान
करीमगंज ( आसाम ) - मताधिक्य १८३६० - All India United Democratic Front ची मते - २९२०५
इंडियन नॅशनल लोक दलानेही एका जागेवर फटका
कुरुक्षेत्र ( हरियाणा ) - मताधिक्य २९०२१ - INLD पक्षाला मिळालेली मते ७८७०८
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात विजय मिळवणारी शिवसेना आणि दुसऱ्या नंबरवर उबाठा यांच्यात मताधिक्य केवळ ४८ मतांचे आहे. याठिकाणी वंचित बहुजन आघाडीने १० हजारपेक्षा अधिक मते मिळवली आहेत ज्याचा फायदा इंडिया आघाडीला झाला असता. हातकणंगले येथेही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १३४२६ मतांनी पराभूत व्हावे लागले आहे. त्याठिकाणी वंचितला ३२ हजार ६९६ मते मिळाली आहेत.
अकोला येथे काँग्रेस उमेदवाराला भाजपानं ४० हजार ६२६ मतांनी हरवलं आहे. तिथे प्रकाश आंबेडकर हे स्वत: उभे होते. या मतदारसंघात वंचितला २ लाख ७७ हजार मते पडली. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील होती. मात्र ६ जागांच्या मागणीमुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकली नाही.