नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. यंदाच्या निवडणुकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) हे वायनाड आणि रायबरेली या दोन मतदारसंघातून निवडून आलेत. त्यामुळे त्यांना या दोन्ही मतदारसंघापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. राहुल गांधींना निर्णय घेण्यासाठी आता ४८ तास उरलेत. रायबरेली या काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघातून राहुल गांधी ३ लाख ९० हजार तर वायनाडमधून ३ लाख ६४ हजार मताधिक्याने राहुल गांधींचा विजय झाला आहे.
नियमानुसार, राहुल गांधी यांना वायनाड किंवा रायबरेली या दोन मतदारसंघापैकी एक जागा सोडावी लागेल. निवडणुकीचा निकाल लागल्यापासून १४ दिवसांत २ पैकी एक मतदारसंघ सोडण्याचा नियम आहे. जर १४ दिवसांत कुठल्याही एका जागेवरून राजीनामा न दिल्यास दोन्हीही जागा रिक्त मानल्या जातात. याचा अर्थ १८ जूनपर्यंत रायबरेली अथवा वायनाड यातील एका जागेवरून राहुल गांधींना राजीनामा द्यावा लागेल. कुठल्याही सदस्याला राजीनामा द्यायचा असेल तर लोकसभा अध्यक्षांकडे लिखित स्वरुपाने द्यावा लागतो. जर एखाद्या सदस्याने राजीनामा दिला तर ६ महिन्याच्या आत त्या जागेवर पोटनिवडणूक घ्यावी लागते.
वायनाडमधून राजीनामा देणार अन् प्रियंका गांधी लढणार?
सध्या लोकसभा सचिवांकडून राजीनामा स्वीकारल्यानंतर त्याचे गॅजेट प्रसिद्ध केले जाईल आणि त्यानंतर ते निवडणूक आयोगाला पाठवले जाईल. निवडणूक आयोग त्या जागेला रिक्त घोषित करून त्याठिकाणी पोटनिवडणुकीसाठी अधिसूचना काढेल. सूत्रांनुसार, राहुल गांधी हे वायनाड मतदारसंघातून राजीनामा देऊ शकतात आणि त्याठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी निवडणूक लढतील असं बोललं जातंय परंतु प्रियंका गांधी निवडणूक लढणार की नाही याबाबत सस्पेन्स आहे.
राहुल गांधी द्विधा मनस्थितीत
लोकसभा निकालानंतर राहुल गांधी यांनी मतदारांचे आभार मानत मी कुठली जागा सोडावी आणि कुठल्या जागेवर कायम राहावे याबाबत द्विधा मनस्थितीत आहे असं म्हटलं मात्र जो काही निर्णय असेल त्याने सर्वांनाच आनंद होईल असे सूतोवाच त्यांनी केले. त्यामुळे वायनाडमधून प्रियंका गांधी निवडणूक लढतील अशी चर्चा सुरू झाली. या चर्चेला केरळ प्रदेशाध्यक्षांनीही दुजोरा दिला. राहुल गांधी वायनाडमधून राजीनामा देतील असं प्रदेशाध्यक्ष के सुधाकरन यांनी संकेत दिले.