नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला बहुमत मिळाल्यानं आता सरकार बनवण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहे. शुक्रवारी दिल्लीत एनडीएच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. या बैठकीनंतर एनडीएनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत सरकार बनवण्यासाठी दावा सांगितला.
संध्याकाळी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींची पुन्हा पंतप्रधानपदी नियुक्ती केली. त्यासोबत नवीन सरकार बनवण्याचं आमंत्रण दिलं. यावेळी महामहिम राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना एक पत्र सोपवलं. ही सर्व नवीन सरकार बनवण्यासाठी एक प्रक्रिया असते. परंतु तुम्हाला या पत्रात नेमकं काय लिहिलेलं असतं हे माहिती आहे का? नसेल तर चला तर मग जाणून घेऊ
नेमकं काय असतं?
भारतीय संविधान अनुच्छेद ७५(१) अंतर्गत मिळालेल्या अधिकाराचा वापर करत राष्ट्रपती म्हणून आपल्याला पंतप्रधान नियुक्त करत आहे. मी आपल्याला विनंती करते की,
- मला केंद्रीय मंत्रिपरिषदच्या सदस्य म्हणून नियुक्त केल्या जाणाऱ्या अन्य लोकांच्या नावाबाबत सल्ला द्यावा
- राष्ट्रपती भवनात आयोजित शपथग्रहण सोहळ्याची तारीख आणि वेळ सांगावी
निकालानंतर सरकार स्थापनेबाबत आतापर्यंत काय काय झालं?
- सर्वात आधी निवडणूक आयुक्तांनी गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत निकाल सोपवला
- गुरुवारी संध्याकाळी भारताच्या राजपत्रात निकाल प्रकाशित करण्यात आला
- शुक्रवारी सकाळी एनडीएच्या सर्व खासदारांची बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड झाली
- एनडीएच्या सर्व नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेत त्यांना बैठकीत झालेल्या ठरावाची माहिती दिली
- संध्याकाळी ६ च्या सुमारास एनडीएचे सभागृह नेते आणि काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेतली.
- राष्ट्रपतींनी संख्याबळाच्या आधारे संविधान अनुच्छेद ७५ (१) अंतर्गत नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदी नियुक्ती केली.
४ जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला २९३ जागा मिळाल्या. त्यानंतर आज एनडीएची बैठक होऊन सरकार स्थापनेचा दावा राष्ट्रपतींकडे करण्यात आला.