नवी दिल्ली - देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. आज एनडीएच्या सर्व खासदारांची संसदेच्या सेंट्रल हॉलला बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदींना नेतेपदी निवडलं गेले. त्यानंतर एनडीएनं राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा केला आहे. येत्या ९ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील असं सांगितले जात आहे. ९ जूनला शुभ मुर्हूत असल्याने मोदी नव्या सरकारची कारकिर्द सुरू करतील असं बोललं जातं.
मात्र ९ जून अन्य काही कारणानेही खास आहे. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान असतील. याआधी पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही तीनदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ९ जूनला स्वातंत्र्य भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनीही शपथ घेतली होती. लालबहादूर शास्त्री यांनी भारतीय राजकारणात त्यांचा वेगळा ठसा उमटवला होता.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर लाल बहादूर शास्त्री हे देशाचे दुसरे पंतप्रधान बनले होते. त्यांनी ९ जून १९६४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. जय जवान, जय किसान अशी घोषणा देणारे शास्त्री दीड वर्ष पंतप्रधानपदी होते. त्याशिवाय ९ जूनला आदिवासी समुदायातील महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा शहीद दिवस आहे. या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेऊन नरेंद्र मोदी आदिवासी समुदायाला संदेश देऊ शकतात. एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीत मोदींनी विशेषरित्या आदिवासी समुदायाचं कौतुक केले होते. त्यामुळे आज सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर रविवार, ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. यासाठीची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
दरम्यान, शुक्रवारी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाली. यानंतर त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. याशिवाय, त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीदेखील भेट घेतली. विशेष म्हणजे, मोदी वेळोवेळी अडवाणी आणि जोशींना भेटायला जातात. यापूर्वी अडवाणींना भारतरत्न देण्यात आला तेव्हा मोदीही त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.