Rahul Gandi : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधीक एकमेकांना आव्हान देत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वादविवाद करण्याचे निमंत्रण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वीकारले आहे. राहुल गांधी यांनी दोन माजी न्यायमूर्तींनी दिलेल्या निवडणूक चर्चेचे निमंत्रण स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितलं. यावर भाजपने आता प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात लढण्याची ताकद आहे का? असा सवाल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विचारला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन लोकूर, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एपी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी आयोजित केलेल्या या चर्चासत्राचे निमंत्रण राहुल गांधी यांनी स्वीकारले. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर भाजपने पलटवार केला आहे. राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचा चेहराही नाहीत, असे भाजपने म्हटले आहे. भाजपचे फायरब्रँड नेते आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी राहुल गांधी कोण आहेत, ज्यांच्याशी पंतप्रधानांनी चर्चा करावी, असा सवाल केला. तर राहुल गांधी हे काय इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? असा सवाल खासदार स्मृती इराणी यांनी केला आहे.
माजी न्यायाधीश आणि ज्येष्ठ पत्रकार यांनी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून सार्वजनिक मंचावर एकत्र येण्याचे आवाहन केले होते. निष्पक्ष आणि अव्यावसायिक मंचावर जर राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन त्यांची भूमिका मांडली तर सामान्य जनतेला नक्कीच त्याचा लाभ होईल, असे या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांनी हे आवाहन स्विकारल्याचे जाहीर केले.
"भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची हिंमत ज्या व्यक्तीमध्ये नाही, त्यांनी बढाई मारणे सोडून द्यावे. दुसरे म्हणजे, ज्याला पंतप्रधान मोदींसोबत बसून वाद घालायचा आहे, मला त्यांना विचारायचे आहे की, ते भारतीय आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का?," असा सवाल स्मृती इराणी यांनी केला आहे.
राहुल गांधींनी काय म्हटलं?
"तुमच्या निमंत्रणाबाबत माझी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची चर्चा झाली. अशा चर्चांमधून लोकांना आमच्या ध्येयधोरणाबाबत पक्की कल्पना मिळेल आणि योग्य निर्णय घेण्यासंबंधी त्यांना दिशा ठरवता येईल. तसेच आपापल्या मंचावरून होणारे बिनबुडाचे आरोप टाळण्यासाठीही अशी चर्चा महत्त्वाची आहे”, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.