सेमीफायनलनंतर आता थेट फायनल! ताज्या सर्वेक्षणात भाजप की काँग्रेस? कुणाचं बनणार सरकार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 12:06 AM2023-12-15T00:06:57+5:302023-12-15T00:09:13+5:30
Loksabha Election Survey: दक्षिण भारतात कुणाला किती जागा?
देशात नुकत्याच पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. यांपैकी तीन राज्यांमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला. यानंतर आता भाजपचे लक्ष लागले आहे, ते पुढील वर्षात होणाऱ्या लोकसभा निडवणुकीकडे. झालेल्या या विधानसभा निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून बघितले जात होते. अशा स्थितीत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार, यासंदर्भात लोकांच्या मनात मोठी उत्सुकता आहे. यातच आता सार्वत्रिक निवडणुकांबाबतचे सर्वेक्षणही समोर येऊ लागले आहे. ताज्या सर्वेक्षणात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील I.N.D.I.A. ला मोठा धक्का बसेल असे चित्र आहे. तर भाजप सलग तिसऱ्यांदा स्वबळावर सरकार स्थापन करण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे.
'टाइम्स नाऊ आणि ईटीजी'च्या ताज्या सर्वेक्षणात एनडीएला 319 ते 339 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर I.N.D.I.A. ला 148-168 जागा मिळण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, आता निवडणुका झाल्यास भाजपला 308-328 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 52-72 जागा मिळू शकतात. याशिवाय वायएसआरसीपी 24-25, डीएमके 20-24, टीएमसी 20-24, बीजेडी 13-15, बीआरएस 3-5 आणि इतरांच्या खात्यात 60-76 जागा जाऊ शकतात, असेहीया सर्वेक्षणात म्हण्यात आले आहे.
कुठल्या राज्यात किती जागा? -
सर्वेक्षणानुसार यूपीमध्ये एनडीएला 70-74 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर I.N.D.I.A. ला 4-8 जागा आणि इतरांना 0-4 जागा मिळू शकतात. दिल्लीमध्ये एनडीएच्या खात्यात सहा ते सात जागा जाऊ शकतात, तर आम आदमी पक्षाला शून्य ते एक जागा मिळू शकते. छत्तीसगडमध्ये एनडीए 10-11 जागा जिंकू शकते आणि I.N.D.I.A. ला 0-1 जागा मिळू शकते. मध्य प्रदेशातील एकूण 29 जागांचा विचार करता, एनडीए 27-29 जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर I.N.D.I.A. ला 0-1 जागा मिळू शखते. तसेच गुजरातच्या सर्वच्या सर्व 26 जागा भाजपच्या पारड्यात जाऊ शकतात.
दक्षिण भारतात कुणाला किती जागा? -
आंध्र प्रदेशात वायएसआरसीपीला 25 पैकी 24 जागा मिळण्याची शक्यता आहे. केरळमध्ये I.N.D.I.A. ला 18-20 जागा मिळू शकतात. तेलंगणामध्ये काँग्रेसला 8-10 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय तामिळनाडूमध्ये I.N.D.I.A. ला 39 पैकी 30-36 जागा मिळू शकतात. एनडीएला येथे मोठा धक्का बसू शकतो आणि केवळ शून्य ते एक जागा मिळू शकते, तर एआयएडीएमकेला 3-6 जागा मिळू शकतात.