नवी दिल्ली - Amit Shah on INDIA Allaince ( Marathi News ) विरोधकांना देशात अस्थिर सरकार हवंय, संपूर्ण देशात जनतेचा या लोकांवर विश्वास नाही. इंडिया आघाडीतल्या एका नेत्यानं सांगितलं, आम्ही दरवर्षी एक एक पंतप्रधान आणू. या देशात स्थिर सरकारने किती फायदे झाले हे जनतेला माहिती आहे. अस्थिर सरकारमुळे होणारं नुकसान देशानं भोगलंय. दीड पिढ्या पुढे गेल्या. गेली २ टर्म मोदींच्या नेतृत्वात देशाला स्थिर सरकार मिळालंय, पुढील टर्मही मोदींच्या नेतृत्वावर जनता विश्वास ठेवेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.
अमित शाह म्हणाले की, आमच्याकडे गेल्या १० वर्षापासून बहुमत आहे. परंतु संविधान बदलण्याबाबत राहुल गांधी जे सांगतायेत त्यावर देश विश्वास ठेवत नाही. संविधान बदलण्यासाठी आमच्याकडे बहुमत आहे हे देशाला माहिती आहे. आम्ही कधीही त्याचा दुरुपयोग नाही. आम्हाला ४०० जागा नक्कीच हव्यात, आम्हाला राजकारणात स्थिरता आणायची आहे. ४०० जागा भारताच्या सुरक्षेला सुरक्षित ठेवण्यासाठी हव्यात. देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकांची बनवण्यासाठी आम्हाला ४०० जागा हव्यात. आजही अनेक घरात शुद्ध पाणी पोहचवणं बाकी आहे त्यासाठी आम्हाला ४०० जागा हव्यात. ७० वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला मोफत उपचार देता येतील यासाठी आम्हाला ४०० जागा हव्यात असं त्यांनी सांगितले. ANI ला शाह यांनी विशेष मुलाखत दिली. त्यात ते बोलत होते.
तसेच आम्ही ४०० जागांच्या बहुमताचा वापर गेल्या १० वर्षात कलम ३७० हटवण्यासाठी केला, तिहेरी तलाक रद्द केले. राम मंदिर बनवलं, समान नागरी कायदा आणला. आमच्या ४०० जागा नव्हत्या परंतु पुरेसे बहुमत होते. या बहुमताचा वापर संविधान सभेने देशाला जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करण्यासाठी १० वर्ष केला. २७२ आणि ४०० जागा याने फरक पडत नाही. बहुमताच्या दुरुपयोगाचा इतिहास आमच्या पक्षाचा नाही. इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसनं केला. संविधानात बदल केले, लोकसभेचा कार्यकाळ वाढवला. आणीबाणी आणली. कुठल्याही कारणास्तव सव्वा लाख लोकांना १९ महिने जेलमध्ये बंद केले असा आरोप अमित शाह यांनी काँग्रेसवर केला आहे.
दरम्यान, जे कलम ३७० वर प्रश्नचिन्ह उभे करतात, त्यांनी काश्मीरमध्ये १४ टक्क्यांवरून मतदान ४० टक्के पार केलंय यापेक्षा मोठं यश कलम ३७० रद्द केल्याचं आहे. सर्व फुटिरतावादी नेते आज मतदान करतायेत. मत कुणाला द्यायचे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु लोकशाही प्रक्रियेचा ते भाग बनले. आधी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या घोषणा दिल्या जायच्या मात्र आज शांततापूर्वक, कुठेही हिंसाचार न होता लोकांनी मतदान केले. हा बदल काश्मीरमध्ये घडलाय. पहिल्यांदा ४० टक्क्याहून अधिक विस्थापित काश्मीर पंडितांनी मतदान केले. हा आकडा आजपर्यंत ३ टक्क्यांच्या वर गेला नव्हता. आपण लोकशाहीसोबत जाऊ शकतो असा विश्वास काश्मिरी जनतेमध्ये आला असंही अमित शाह यांनी म्हटलं.