Mamata Banerjee : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातलं राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सोमवारी मोठं विधान केलं आहे. मी पंतप्रधान मोदींसाठी कोणताही पदार्थ तयार करण्यास तयार आहे, पण मी तयार केलेला पदार्थ त्यांना खायला आवडेल का? असं विधान ममता बॅनर्जी यांनी केले. ममता बॅनर्जी यांच्या विधानाने भाजप चांगलीच आक्रमक झाली असून ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना दिसत आहे.
मी मासे, मांस आणि अंडी खात नाही या पंतप्रधान मोदींच्या विधानावर बोलताना ममता बॅनर्जींनी प्रत्युत्तर दिलं. काही दिवसांपूर्वी मोदींनी राजद नेते तेजस्वी यादव यांचा मासे खाण्यावरुन खरपूस समाचार घेतला होता. हिंदूंनी मांसाहार टाळला असतानाही तेजस्वी यादव मासे खात आहेत. बंगालच्या निवडणूक प्रचारात माशांविषयी बोलणे सामान्य झाले आहे, असं मोदींनी म्हटलं होतं. तेव्हापासून बंगालमधील प्रचारात माशांचा मुद्दा तापला आहे.
ममता बॅनर्जी सोमवारी बॅरकपूरमध्ये आयोजित एका सभेला संबोधित करताना मोदींच्या विधानावर भाष्य केले. "लोक त्यांना आवडेल ते खातील. तुम्हाला आवडेल ते तुम्ही खाऊ शकता. जे लोक शाकाहारी आहेत ते शाकाहारी अन्न खाऊ शकतात. ज्यांना मांस खायचे आहे ते मांस खाऊ शकतात. हा देश आपल्या सर्वांचा आहे. इथे वेगवेगळ्या भाषा, संस्कृती आहेत. मोदींसाठी स्वयंपाक करायला मला आनंद होईल, पण पंतप्रधान मी शिजवलेले अन्न खायला तयार होतील की नाही याची मला खात्री नाही. मी लहानपणापासून स्वयंपाक करते. लोक माझ्या जेवणाचे कौतुक करतात पण मोदीजी माझे जेवण स्वीकारतील का? ते (मोदी) माझ्यावर विश्वास ठेवतील का? त्यांना (मोदींना) जे आवडेल ते मी तयार करेल," असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
मला ढोकळा सारखे शाकाहारी पदार्थ आणि माशाचे कालवण सारखे मांसाहारी पदार्थ दोन्ही आवडतात. हिंदूंच्या विविध पंथांच्या त्यांच्या स्वतःच्या विशिष्ट चालीरीती आणि खाण्याच्या सवयी आहेत. माणसाच्या खाण्याच्या सवयींवर बंधने घालणारा भाजप कोण आहे? यावरून असे दिसतं की भाजपला भारताबद्दल आणि त्यातील सर्वसमावेशकतेबद्दल फारच कमी ज्ञान आहे, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
दरम्यान, ममता बॅनर्जींच्या या ऑफरवर भाजपने टीका केली आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी ममता बॅनर्जीवर निशाणा साधला. ममता बॅनर्जी मोदींना स्वतःच्या हातांनी बनवलेले मासे आणि भात खाऊ घालू इच्छितात. पण त्याआधी त्या त्यांचा विश्वासू फिरहाद हकीमला का खाऊ घालत नाही?, असा सवाल रॉय यांनी केला.