Narendra Modi On ED Action : दिल्लीतल कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी मोठा दिलासा दिला. सुप्रीम कोर्टानं केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. तसेच कोर्टाने लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करण्याची परवानगी देखील केजरीवाल यांना दिली. या सगळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडीच्या कारवाईवरुन महत्त्वाचं विधान केलं आहे. ईडी प्रकरणांमध्ये केवळ तीन टक्केच राजकीय लोक आहेत असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी ओडिशात भाजपच्या प्रचार रॅलनीमध्ये सहभाग घेतला. यावेळी एबीपी न्यूजच्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींना विरोधकांना शांत करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर केला जातो का असं विचारण्यात आलं होतं. त्यावर मोदींनी ईडीने कारवाई केलेल्या राजकारण्यांची संख्या केवळ तीन टक्केच आहे असं म्हटलं.
"या देशातील सर्व ईडी प्रकरणांमध्ये केवळ तीन टक्के राजकीय लोक आहेत. ९७ टक्के ड्रग्ज माफिया, भूमाफिया आणि बंदूक व्यवसायात गुंतलेले आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. नोटांचे ढिगारे बाहेर पडत आहेत, हा त्याचा थेट पुरावा आहे. पश्चिम बंगाल असो की झारखंड, सर्वत्र नोटांचे ढिगारे निघत आहेत. बँकाच्या मशीन नोटा मोजून थकल्या आहेत. जवळपास सव्वा लाख कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. जर हे निर्दोष असतील तर एवढे पैसे आले कुठून?," असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला. त्यामुळे ५० दिवसांनी केजरीवाल तुरुगांतून बाहेर आले. मात्र,केजरीवाल यांच्या जामीनाची मुदत केवळ १ जून पर्यंत असणार आहे. त्यानंतर २ जून रोजी अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा आत्मसमर्पण करावे लागणार आहे, असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलं आहेत.