नवी दिल्ली - Amit Shah on Plan B ( Marathi News ) मी राजकीय चाणक्य नाही. प्लॅन बी तेव्हाच बनवावा लागतो जेव्हा प्लॅन A मध्ये ६० टक्क्यांहून कमी शक्यता असते. शतप्रतिशत नरेंद्र मोदी प्रचंड बहुमताने निवडून येतील असा मला विश्वास आहे. हा देश सुरक्षित राहावा. देश समृद्ध व्हावा. जगात सन्मान व्हावा. हा देश आत्मनिर्भर आणि विकसित भारत बनायला हवा हे प्रत्येक भारतीयाला वाटते. गेल्या १० वर्षात जगात भारताचा सन्मान वाढलाय हे प्रत्येकाला वाटतं असं विधान केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांनी केले आहे.
४ जूनला केंद्रात जर भाजपाला २७२ जागांच्या वर जाता आलं नाही तर काय असा प्रश्न मुलाखतीत अमित शाहांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, या देशात मोदींसोबत ६० कोटी लाभार्थ्यांची फौज मजबुतीनं उभी आहे. ज्यांचा ना कुठली जात आहे, ना कुठलं वय आहे. आम्ही ४ कोटी गरिबांना घरे दिलीत, आणखी ३ कोटी निवडून आल्यानंतर देणार आहोत. ३२ कोटी आयुष्यमान कार्ड दिलीत ज्याचा फायदा ६० कोटींना ५ लाखापर्यंतचे उपचार मोफत मिळतील. १४ कोटी घरात नळातून पाणी दिलं. १० कोटींहून अधिक घरात गॅस सिलेंडर दिलेत. १२ कोटी घरी शौचालय बनवलं आहे. १ कोटी ७१ लाख गरीब महिलांना लखपती दिदी बनवलं आहे. आणखी ३ कोटी महिलांना लखपती दिदी बनवायचं आहे. ११ कोटी शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार त्यांच्या बँक खात्यात थेट दिले जातात. प्रत्येक गरिबाला दरमहिना ५ किलो धान्य मोफत दिले जाते असं त्यांनी म्हटलं.
तसेच या ६० कोटी लोकांनी कधी निवडणूक प्रक्रिया आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांचा वाटा आहे याचा विचार कधी केला नव्हता. स्वातंत्र्यानंतर एक पंतप्रधान असा आला, ज्यांनी ६० कोटी जनतेसाठी योजना बनवल्या आणि त्या जमिनीवर पोहचवल्या. २ लाख गावात भारत नेट पोहचलं आहे. डिजिटल व्यवहारात जगात भारताचं नाव घेतले जाते. राष्ट्रीय महामार्ग १ लाख ५० हजार किमीचे बनलेत. दिवसाला २८ किमी हायवे बनतो. ग्रामीण भागात रस्ते सुधारले. विमानतळे वाढवण्यात आली. १ जीबी डेटाची किंमत २६९ रुपये आधी होती ती आज १० रुपये झालीय. या सर्व गोष्टी ज्या लोकांना मिळाल्यात, जे लाभार्थी आहेत त्यांना नरेंद्र मोदी का हवेत आणि त्यांना का मत द्यायला हवे हे माहिती आहे असंही अमित शाह यांनी सांगितले. ANI च्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही उत्तरे दिली.
दरम्यान, काहीजण व्हॉट्सअप आणि चॅनेल पाहतात. परंतु आम्ही लाखो किमी दौरे करून कोट्यवधी लोकांसोबत जनसंपर्क करतोय हे कुणाला दिसत नाही. जोपर्यंत भाजपाचा एक खासदारदेखील संसदेत आहे तोपर्यंत एससी, एसटी आणि ओबीसी यांच्या आरक्षणाला कुणीही धक्का लावू शकत नाही. नरेंद्र मोदी यांच्याशिवाय मोठा एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाचा कुणी समर्थक नाही असंही अमित शाहांनी आरक्षण रद्द करण्यावरून झालेल्या आरोपावर भाष्य केले.