आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पार्टीचे उमेदवार पी. चंद्रशेखर हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे तब्बल ५,७८५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. चंद्रशेखर हे गुंटूर मतदारसंघातील उमेदवार आहेत. चंद्रशेखर हे व्यवसायाने डाॅक्टर आहेत. भारतात एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर अमेरिकेतून वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे.त्यांच्याविरोधात एकही गुन्हेगारी खटला नाही. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील एकूण उमेदवारांमध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते. त्यांच्याकडे ७१७ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
चंद्रशेखर यांच्याकडे २,४४८ कोटींची एकूण संपत्ती तर पत्नी श्रीरत्ना कोनेरु यांच्या नावे २,३४३ कोटी संपत्ती आहे. त्यांच्यावर १,१३८ कोटी व्यावसायिक कर्ज आहे त्याचसोबत १०१ कंपन्यांचे शेअर्स त्यांच्याकडे आहेत.