जालंधर - Congress on Arvind Kejariwal ( Marathi News ) इंडिया आघाडीत काँग्रेस आणि आप दिल्लीत एकत्रित निवडणूक लढवत आहेत तर पंजाबमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. त्यातच या दोन्ही पक्षातील विरोधाभास आता समोर येऊ लागला आहे. बुधवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जालंधर येथे काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांनी निशाणा साधला. अरविंद केजरीवाल फक्त १५ दिवसांसाठी जेलच्या बाहेर आलेत. त्यांच्यावर विश्वास का ठेवायचा असा सवाल चन्नी यांनी विचारला आहे.
काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी म्हणाले की, केजरीवाल हे खूप मोठ्या दारु घोटाळ्याच्या आरोपातून केवळ १५ दिवसांसाठी जेलच्या बाहेर आलेत. त्या व्यक्तीवर तुम्ही ठेवू शकता का? दिल्लीत खूप मोठा दारू घोटाळा झाला, तो पंजाबमध्येही झाला आहे. पंजाबमध्ये अद्याप कारवाई झाली नाही. दिल्लीमध्ये दारूची पॉलिसी मागे घेतली, पंजाबमध्ये अद्यापही सुरू आहे. केजरीवाल यांचं पंजाबमध्ये स्वागत नाही तर विरोध व्हायला हवा असं त्यांनी सांगितले.
तसेच पंजाबमध्ये ८० हजार कोटी कर्ज घेऊन आम आदमी पार्टी कॅम्पेन चालवत आहे. पंजाबला लुटलं जातंय. या प्रकाराचा काँग्रेस विरोध करते. दिल्लीसारखाच पंजाबमध्येही दारू घोटाळा झाला असून मुख्यमंत्री भगवंत मान चौकशीपासून दूर आहेत. त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. पंजाब सरकारच्या पैशाचा दुरुपयोग केला जातोय. लोकांचे पैसे लुटले जातायेत. मोफत धान्य, वीज दिल्यानं कुणी श्रीमंत आणि समाधानी होत नाही. विकासाचा विचार असेल तर युवक विचार करतात असा टोलाही काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांनी केजरीवालांना लगावला आहे.
दिल्लीत अरविंद केजरीवाल करतायेत काँग्रेसचा प्रचार
दिल्लीत कन्हैया कुमारविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दिल्ली सरकारची परवानगी हवी होती. परंतु अनेक दिवस दिल्ली सरकारने ही फाईल रोखून धरल्याने अरविंद केजरीवाल यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये कन्हैया कुमार यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्याला हिरवा कंदील दाखवला. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. कन्हैया कुमार उत्तर पूर्व दिल्लीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासाठी अरविंद केजरीवाल लोकांकडे मतदानाचं आवाहन करत आहे. काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार आणि उदित राज यांच्या प्रचारासाठी केजरीवाल रोड शो करणार आहेत. जो करे केजरीवाल को प्यार, वो करे मोदी को इन्कार असा नवा नारा आम आदमी पक्षाने दिला आहे.