पाटणा - चोरीच्या अनेक घटना सातत्याने समोर येत असतात. चोर देखील चोरी करताना नानाविध शक्कल लढवत असतात. खोट्या बंदुकीचा धाक दाखवून एका चोराने फक्त दोन मिनिटांत बँक लूटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाटणामध्ये एका चोराने बँकेतून तब्बल 9.12 लाखांची रोख रक्कम लंपास केली आहे. चोराकडे कोणतेही हत्यार नसताना केवळ खोट्या बंदुकीचा धाक दाखवून त्याने चोरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या पाटणामध्ये चोराने अवघ्या दोन मिनिटांत बँक लुटली आहे. बँकेतून 9.12 लाखांची रक्कम चोरी केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गरिमा मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वीणा चित्रपटगृहाजवळ यूनायटेड बँक ऑफ इंडिया आहे. या शाखेत दुपारी चोरीच्या घटना घडली आहे. चोराने खोट्या बंदुकीचा धाक दाखवून बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर 9 लाख घेऊन तो पसार झाला.
मंगळवारी (31 डिसेंबर) ही घटना घडली. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये चोर दोन्ही हातांनी पिशवीत कॅश भरताना दिसतो आहे. त्याच्याकडे कोणतच हत्यार नव्हतं. मात्र हत्यार असल्याचा दिखावा करत होता अशी माहिती गरिमा मलिक यांनी दिली आहे. सीसीटीव्ही फूटेजनुसार चोराने मंगळवारी दुपारी 3 वाजून 4 मिनिटांनी बँकेत प्रवेश केला. बँक लुटून तो 3 वाजून 6 मिनिटांनी पसार झाला. म्हणजेच चोराने फक्त दोन मिनिटांमध्ये बँक लुटली आहे.
बँकेत ज्यावेळी चोरी झाली त्यावेळी एकही सुरक्षारक्षक उपस्थित नव्हता. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच बँकेत झालेल्या या चोरी प्रकरणात बँकेच्या कर्मचाऱ्यांचा हात आहे का? याचा देखील पोलीस तपास करत आहेत. शाखेचे मॅनेजर अमित पालीवाल यांनी ही घटना इतक्या जलद गतीने झाली की, कोणाला कसलाच विचार करण्याचा वेळ मिळाला नाही, तसेच चोरीच्या वेळी कोणत्याही प्रकारचा सिक्यॉरिटी अलार्मही वाजला नाही अशी माहिती दिली आहे. तसेच चोरी होण्याआधी तासाभरापूर्वी बँकेतून 54 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याची माहिती यूनियन बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक पी. के. मिश्र यांनी दिली आहे. चोरीच्या वेळी काउंटरवर 10 लाख 74 हजार रुपये होते. त्यापैकी 9 लाख 12 हजार रुपये लुटण्यात आले आहेत.