फरिदाबाद -पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेला वाद अद्यापही सुरु आहे. हरियाणामधील भाजपाचे प्रमुख मीडिया कोऑर्डिनेटर सूरजपाल अम्मू यांनी आपण जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत फरिदाबाद आणि गु़डगावमध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी धमकी दिली आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्गाला लागून असणा-या आयनॉक्स ईएफ-3 चित्रपटगृहात पद्मावतीचे पोस्टर्स लावल्यामुळे क्षत्रिय समाजातील काही लोकांनी मॉलमध्ये घुसून तोडफोड केली. यामुळे काही वेळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मॉलचे व्यवस्थापक आणि कर्मचा-यांनी परत हे पोस्टर्स न लावण्याचं आश्वासन दिल्यानंतरच, निदर्शन मागे घेण्यात आलं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस घटनास्थळी पोहोचले होते, पण तोपर्यंत तोडफोड करणारे निघून गेले होते.
पत्रकार परिषदेदरम्यान सूरजपाल अम्मू यांनी सांगितलं की, 'भारत एक स्वतंत्र देश आहे. या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यामुळे मी मला जे हवं ते बोलणार. मला जम्मू काश्मीर, पश्चिम बंगालसहित अन्य ठिकाणांहून धमकी मिळाली आहे, पण मी घाबरणार नाही. मी समाजासाठी लढत असून, हा समाजच माझी ताकद आहे. आजपर्यंत चित्रपटात ठाकुरांना फक्त बलात्कार आणि चोरी करणारे दाखवत त्यांची प्रतिमा बदनाम करण्यात आली. पण राजपूत समाज आता हे सहन करणार नाही'.
सूरजपाल अम्मू यांनी आपण लंडनमध्येही चित्रपट लागू देणार नसल्याचं सांगितलं आहे. आपण लंडनच्या व्हिसासाठी अर्ज केला असून, लवकरच तिथे जाऊन आपल्या समाजातील लोकांसोबत निदर्शन करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यांनी सांगितलं की, एक हिंदू म्हणून जर हा चित्रपट रोखण्यात मी यशस्वी झालो तर माझं आयुष्य पणाला लागलं असं मी समजेन. हरियाणातही चित्रपटावर बंदी आणण्यात यावी यासाठी आपण मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासोबत बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दीपिका आणि संजय लिला भन्साळींचं शीर कापणा-याला 10 कोटींचं बक्षिसयाआधी सूरजपाल अम्मू यांनी दीपिका आणि संजय लिला भन्साळींचं शीर कापणा-याला 10 कोटींचं बक्षिस देण्याची घोषणा केली होती. दीपिका आणि भन्साळी यांचं शीर कापणा-याला आपल्याच समाजातील लोकांकडून 10 कोटी गोळा करुन देण्यात येतील . इतकंच नाही तर, जो कोणी संजय लिला भन्साळी यांचं शीर कापेल त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आपण घेऊ अशीही घोषणा त्यांनी केली होती. रणवीर सिंह याने एका मुलाखतीत आपला भन्साळींना पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं. यावर बोलताना त्यांनी रणवीर सिंगला धमकी देत, आपले शब्द मागे घेतले नाहीत तर त्याचे हात पाय तोडण्यात येतील अशी धमकीच देऊन टाकली होती.