नवी दिल्ली - आमची लढाई दहशतवादाशी आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानी भूमीमध्ये जोपर्यंत दहशतवादी तळ निर्माण होत राहतील तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर कारवाई करत राहू, असा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या तिन्ही सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पुरावे सादर केले. त्यावेळी मेजर जनरल सुरेंद्र सिंह महल यांनी सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी असलेल्या लष्कराच्या सज्जतेची माहिती दिली.
यावेळी मेजर जनरल सुरेंद्र सिंह महल यांनी सुरक्षितेविषयी देशवासियांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. ''भारतीय लष्कराची कुठल्याही आक्रमणाचा सामना करण्याची सज्जता झालेली आहे. तसेच देशात शांतता, स्थैर्य कायमा राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमची लढाई ही दहशतवादाशी आहे. त्यामुळे जोपर्यंत पाकिस्तानात दहशतवादी असतील तोपर्यंत आम्ही त्यांचे तळ उद्ध्वस्त करत राहू,'' असा रोखठोक इशाराच त्यांनी दिला.