मुंबई : एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे वाढत्या उष्म्याने बेजार केल्याने कधी येतो एकदाचा...असे झालेला मान्सून शनिवारी सकाळी अखेर देवभूमी मानल्या जाणाऱ्या केरळात दाखल झाला. त्याच्या पुढच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण असल्याने १३ ते १५ जून दरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
आठवडाभराच्या लांबणीनंतर केरळात दाखल झालेल्या मान्सूनचा प्रवास समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणखी वेगाने होणार आहे. येत्या ४८ तासांत मान्सून अरबी समुद्राचा आणखी काही भाग व्यापेल. तसेच अनुकूल हवामानामुळे येत्या ४८ तासांत तो उत्तर पूर्वेकडील राज्यांतही दाखल होईल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
मेघगर्जनेसह पाऊस९ जून : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तर, मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट होईल. मेघगर्जनेसह पाऊस पडेल.११-१२ जून : रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.