नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देर आए दुरुस्त आए' म्हणत संयुक्त राष्ट्रांचे आभार मानले आहेत. दहशतवादविरोधी लढ्याबाबत भारताला मिळालेलं हे मोठं यश आहे. तसेच, हा नवीन भारत असून 130 कोटी देशवासीयांचा आवाज जगभरात ऐकला जातो. आता, भारताकडे दुर्लक्ष करता येत नाही. ही तर सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या..., असे म्हणत मोदींनी मसूद अजहरबाबत संयुक्त राष्ट्राने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.
भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढ्याला आज मोठे यश मिळाले आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि भारतामध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आज आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नांमध्ये चीननं वारंवार खोडा घातला होता. त्यामुळे मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात अडथळे येत होते. मात्र, अजहर प्रकरणात अडथळा आणला जाणार नसल्याचे संकेत चीनकडून देण्यात आले होते. त्यानंतर, अखेर आज अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले. पाकिस्तानात लपून बसलेल्या अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
पंतप्रधान मोदींनी अजहरवरील कारवाईचे स्वागत करताना पुन्हा एकदा एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख करत दहशवादाविरुद्ध भारताची लढाई जोरात सुरू असल्याचे म्हटले. देशातील 130 कोटी भारतीयांच्या सामूहिक शक्तीचे हे प्रतिक असल्याचे मोदींनी म्हटले. आजचा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा दिवस आहे. देशात सध्या आत्मविश्वासाचं वातावरण असून कुठल्याही राजकीय पक्षाने या वातावरणात बाधा आणू नये, असे आवाहनगी मोदींनी केले. जगातील बहुतांश देश आज भारताच्या पाठिशी उभे असून मी त्यांचे आभार मानतो. संयुक्त राष्ट्राच्या निर्णयानंतर पाकिस्तामधील जागरुक नागरिक तेथील सरकारवर आणखी दबाव टाकतील, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केल.