ऑनलाइन लोकमत
पाटना, दि. 13 - भ्रष्ट्राचाराच्या आरोपात सापडलेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एक व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट केला आहे.
बुधवारी तेजस्वी यादव यांच्या सुरक्षारक्षकांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण केल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. याला उत्तर देण्यासाठी तेजस्वी यादव यांनी ट्विटवर हा व्हिडिओ अपलोड केला असून "पहा, बिहारमध्ये लालूंचा मुलगा कसा गुंडागर्दी वाढवत आहे." असे लिहिले आहे.
याचबरोबर, तेजस्वी यादव यांनी अपलोड केलेल्या या व्हिडिओमध्ये असे दाखविण्यात आले आहे की, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी हे सचिवालयाच्या परिसरात तैनात करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांना मारहाण करत आहेत. तसेच, यामध्ये तेजस्वी यादव यांच्या डोक्याला माईक लागून जखम झाल्याचे आणि शेवटच्या टप्प्यात एका पोलिसाच्या डोक्यात एक प्रतिनिधी रागाने कॅमे-याने मारत असल्याचे दाखविण्यात आले आहे.
दरम्यान, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तेजस्वी यादव यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे सीबीआयकडून सुरू असलेल्या चौकशीमुळे सध्या ते अडचणीत सापडले आहेत.त्यामुळे विरोधी पक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. काल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीनंतर तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रसारमाध्यमांचे अनेक प्रतिनिधी बाहेर ताटकळत उभे होते. त्यामुळे तेजस्वी यादव सचिवालयातून बाहेर पडतात प्रसारमाध्यमांनी त्यांच्याभोवती मोठी गर्दी केली होती. त्यावेळी तेजस्वी यादव यांच्या सुरक्षारक्षकांनी एका कॅमेरामन आणि वृत्तवाहिनीच्या एका प्रतिनिधीला अक्षरश: धक्के मारून तेथून दूर केले. साहजिकच या प्रकारामुळे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी प्रचंड संतापले होते.
दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या परिवाराविरोधात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून सीबीआयने कारवाई केल्यापासून बिहारमधील महाआघाडीला हादरे बसू लागले आहेत. आता या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आलेल्या तेजस्वी यादव यांच्या भवितव्याबाबत राष्ट्रीय जनता दलाने पुढील चार दिवसांत निर्णय घ्यावा, असे अल्टिमेटम नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने (जेडीयू) लालूप्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला दिला होता.