ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - सिक्कीमच्या सीमेवरील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हिंदी महासागरात चीनी नौदलाच्या हालचाली वाढत चालल्या आहेत. ड्रॅगनच्या हिंदी महासागरातील या सर्व हालचालींवर जीसॅट-7 म्हणजे रुक्मिणीच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. रुक्मिणीला नौदलाचे आकाशातील नेत्र म्हटले जाते. रुक्मिणी हा खास नौदलासाठी तयार करण्यात आलेला उपग्रह असून, 29 सप्टेंबर 2013 पासून हा उपग्रह कार्यान्वित आहे.
दळवळण आणि टेहळणी या दुहेरी उद्देशाने तयार केलेला हा उपग्रह 2,625 किलो वजनाचा आहे. या उपग्रहामुळे भारतीय नौदलाला आपसात समन्वय राखण्यास मदत मिळते. रुक्मिणीच्या मदतीने फक्त अरबी समुद्रच नव्हे तर, आखातापासून ते मल्लाकाच्या समुद्रधुनीपर्यंतच्या सागरातील हालचाली नौदलाला टिपता येतात.
आणखी वाचा
2013 मध्ये इस्त्रोकडे अत्याधुनिक जीएसएलव्ही रॉकेट नसल्यामुळे चार टन वजनाच्या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याची क्षमता नव्हती. त्यावेळी इस्त्रोने फ्रेंच अवकाश संशोधन संस्थेच्या मदतीने जीसॅट-7 उपग्रह अवकाशात पाठवला होता. हा उपग्रह बनवण्यासाठी इस्त्रोला 185 कोटी रुपये खर्च आला. जीसॅट-7 चे सरासरी आर्युमान नऊवर्ष असल्याने नौदलाला नऊवर्षापर्यंत सेवा मिळू शकते.
जीसॅट-7 च्या आधी नौदलाला युध्दनौकांमधील समन्वयासाठी इनमारसॅट उपग्रहावर अवलंबून रहावे लागत होते.
स्वत:च्या उपग्रहामुळे नौदलाची परदेशी उपग्रहावर अवलंबून राहण्याची क्षमता कमी झाली आहे. सिक्कीम सीमेवर चीनच्या आक्रमकतेला भारतही त्याच भाषेत प्रत्युत्तर देत असल्याने चीनने आता समुद्रात शक्तीप्रदर्शन सुरु केले आहे. मागच्या काही दिवसात हिंदी महासागरात चीनी युद्धनौकांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून, समुद्रातील चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय नौदलाचे बारीक लक्ष आहे.
सिक्कीमच्या डोकलाम भागात चीनच्या रस्ते बांधणीवर भारताने आक्षेप घेतल्याने हा सर्व तणाव निर्माण झाला आहे. भारताने इथून मागे हटावे यासाठी चीन युद्धखोरीची भाषा करुन भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. भारतावर दबाव वाढवण्यासाठी चीनने आता हिंदी महासागरात युद्धनौकांची संख्या वाढवण्यास सुरुवात केली आहे.