ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - कुलभूषण जाधव यांच्या आईने व्हिसासाठी अर्ज करुनही साधी त्याची दखलही न घेतल्याबद्दल केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार सचिव सरताज अझीझ यांना चांगलंच धारेवर धरत खडे बोल सुनावले आहेत. कुलभूषण जाधव भारतीय नागरिक असून हेरगिरी, विघातक कारवाया आणि दहशतवादी कृत्ये केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आणखी वाचा
भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा नाकारल्याच्या बातम्या पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये येऊ लागल्यानंतर सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून चुकीचे आरोप लावण्यावरुन पाकिस्तानला सुनावलं आहे. सुषमा स्वराज यांनी ट्विट करत पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. याचवेळी सुषमा स्वराजांनी कुलभूषण जाधव यांचाही मुद्दा उचलच सरताज अझीझ यांना त्यांच्याच भाषेत ऐकवलं आहे.
पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा मिळत नसल्याच्या मागे सरताज अझीझ कारणीभूत असल्याचं सुषमा स्वराज बोलल्या आहेत. पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा देण्यामध्ये भारताला कोणतीही समस्या नसून आनंदच आहे, मात्र यासाठी अझीझ यांनी देशाच्या नागरिकांसाठी मध्यस्थी करण्याची गरज असल्याचं सुषमा स्वराज बोलल्या आहेत.
सुषमा स्वराज यांनी पुन्हा एकदा नियमात झालेला बदल स्पष्ट करत पाकिस्तानी नागरिकाला उपचारासाठी तात्काळ मेडिकल व्हिसा हवा असेल तर सरताज अझीझ यांच्या पत्राची आवश्यकता असल्याचं सांगितलं आहे. "मेडिकल व्हिसा हवा असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी सरताज अझीझ यांची शिफारस असलेलं पत्र आणल्यास तात्काळ व्हिसा देण्यात येईल असं आश्वासन मी देते", असं सुषमा स्वराजांनी सांगितलं आहे.
यानंतर सुषमा स्वराजांनी अवंतिका जाधव यांचा उल्लेख करत पाकिस्तानल धारेवर धरलं. "आपल्या मुलाला भेटण्यासाठी अवंतिक जाधव यांनी केलेला अर्ज अद्याप प्रलंबित आहे", असं सुषमा स्वराज बोलल्या आहेत. सुषमा स्वराज येथे कुलभूषण जाधव ज्यांना पाकिस्तानात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांच्याबद्दल बोलत आहेत. "सुषमा स्वराज यांनी यासंबंधी पत्रही लिहिलं होतं. मात्र त्याची दखलही साधी घ्यावीशी वाटली नाही", असं सांगत सुषमा स्वराज यांनी सरताज अझीझ यांना ऐकवलं आहे.
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी गेल्या आठवड्यात भारतीय दूतावास कॅन्सर पीडित महिलेला व्हिसा नाकारत असल्याचं वृत्त दिलं होतं. महिलेने सुषमा स्वराज यांना ट्विट करत मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. भारताने सरताज अझीझ यांची शिफारस असलेलं पत्र आणण्याबद्दल स्पष्ट सांगितल्यानंतरही पाकिस्तानने उद्दामपणा करत भारत जाणुनबुजून व्हिसा नाकारत असल्याचं वृत्त दिलं होतं.