नवी दिल्ली, दि. 1 - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याची दत्तक मुलगी हनीप्रीत सिंगविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. हनीप्रीत सिंग सध्या फरार असून हरियाणा पोलिसांनी ही नोटीस जारी केली आहे. न्यायालयाने गुरमीत राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर त्याला पळवून नेण्याचा कट आखल्याचा आरोप हनीप्रीत सिंगवर करण्यात आला आहे. पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली असल्याने हनीप्रीत सिंग देश सोडून जाऊ शकत नाही.
पोलिसांनी डेरा सच्चा सौदाचा प्रवक्ता आदित्य इन्साविरोधातही अशीच नोटी जारी केली आहे. राम रहीमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर हिंसा भडकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काहीजणांनी हनीप्रीत फरार असल्याचं सांगितलं आहे. तर काही रिपोर्टनुसार, रोहतकमधील एका अनुयायाच्या घरात ती राहत आहे. राम रहीमला बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर न्यायालयाच्या आवारातून पळवून नेण्याचा तसंच हिंसा भडकवल्याचा आरोप हनीप्रीतवर आहे अशी माहिती हरियाणाचे पोलीस उपायुक्त मनबीर सिंग यांनी दिली आहे.
पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असून आदित्य हा मुख्य आरोपी आहे. राम रहीमच्या समर्थकांना भडकवण्यामध्ये आदित्यचा मुख्य हात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. बाबा राम रहीम याला बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आल्यानंतर हिंसा भडकली होती. यामध्ये 38 जणांचा मृत्यू झाला होता, तर करोडोंच्या संपत्तीचं नुकसान झालं होतं. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीप्रीत आणि आदित्य या दोघांनाही राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर उद्बवणा-या परिस्थितीची कल्पना होती.
दरम्यान, राम रहीमला कारागृहात नेण्यात येत असताना वापरण्यात आलेल्या हेलिकॉप्टरमध्ये हनीप्रीतला बसण्याचा परवानगी कशी काय देण्यात आली याचा तपास हरियाणा सरकार करत आहेत. बाबा राम रहीमला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये हनीप्रीत सोबत असल्याचं दिसत होतं. हेलिकॉप्टरमध्येही ती सोबतच होती.
2011 मध्ये हनीप्रीत प्रकाशझोतात आली होती, जेव्हा तिच्या पतीने न्यायालयात याचिका दाखल करत पत्नीचं लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप केला होता. यानंतर ही याचिका त्याने मागे घेतली होती.
बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सोदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला सीबीआय विशेष न्यायालयातून पळवून नेण्याचा कट आखला गेला होता. एकूण सातजणांनी मिळून राम रहीमला पळवून नेण्याचा कट आखला होता. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये हरियाणाच्याच काही पोलिसांचाही समावेश होता. तर इतर दोनजण खासगी सुरक्षा रक्षक होते. मात्र या सातजणांची तिथे तैनात असलेल्या इतर पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांना कटाचा अंदाज आल्यामुळे राम रहीमला पळवण्याचा प्लान फसला.
पोलीस महासंचालक के के राव यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे की, न्यायालयाने राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर लगेचच त्याने आपण आणलेली लाल बॅग देण्याची मागणी केली. सिरसाहून त्याने ती बॅग आणली होती. 'आपले कपडे बॅगेत असल्याचं सांगत त्याने बॅग मागितली. खरंतर तो त्याच्या समर्थकांसाठी एक सिग्नल होता. दोषी ठरवण्यात आल्यानंतर समर्थकांनी जास्तीत जास्त हिंसा करुन अडथळा निर्माण करावा यासाठी आखलेला तो कट होता', अशी माहिती के के राव यांनी दिली आहे.
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्काराच्या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयाने 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने बाबा राम रहीमला दोषी ठरवलं होतं. दोषी ठरवल्यानंतर झालेला हिंसाचार लक्षात घेता तुरुंगातच न्यायालय भरवून शिक्षा सुनावण्यात आली. निकाल सुनावण्यासाठी न्यायाधीशांना विशेष हेलिकॉप्टरने रोहतकच्या तुरुंगात आणण्यात आलं होतं. राम रहीम याला बलात्काराच्या दोन्ही प्रकरणांमध्ये प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याचबरोबर, राम रहीमला न्यायालयाने दोन्ही प्रकरणांमधे प्रत्येकी 15 लाख रुपये याप्रमाणे 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, या दंडाच्या रकमेतील दोन्ही पीडितांना प्रत्येकी 14 लाख रुपये देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. दरम्यान, राम रहीम कोर्टरुममध्ये हात जोडून उभा असून दयेसाठी याचना करत होता. इतकंच नाही तर रडूही लागला होता.