नवी दिल्ली - 26 जानेवारीला दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता दिल्ली पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गृहमंत्रालय आता हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची तयारी करत आहे. यासंदर्भात दिल्ली पोलीस लवकरच हिंसा पसरवणाऱ्या शेतकरी नेत्यांविरोधात लुकआउट नोटीस बजावणार आहे. लुकआउट नोटीसनंतर या लोकांचे पासपोर्टदेखील जप्त करण्यात येणार आहेत.20हून अधिक शेतकरी नेत्यांना नोटीस जारी -दिल्ली पोलिसांनी हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 37 जणांना जबाबदार धरले असून एफआयआरदेखील नोंदवला आहे. एवढेच नाही, तर दिल्ली पोलिसांना 20 हून अधिक शेतकरी नेत्यांना नोटीसदेखील पाठविली आहे. यात योगेंद्र यादव, बलदेव सिंग सिरसा आणि राजेवाल यांच्या नावाचाही समावेश आहे. या सर्वांकडून तीन दिवसांच्या आत उत्तर मागविण्यात आले आहे. आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, असा सवाल या नोटिशीच्या माध्यमाने या नेत्यांना करण्यात आला आहे.
शेतकरी नेत्यांनी दिलेला शब्द पाळला असता, तर हिंसाचार झाला नसता - पोलीस आयुक्त -दिल्ली पोलीस आयुक्त एसएन श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत दावा केला आहे, की शेतकरी नेत्यांनी दिलेला शब्द पाळला असता तर हिंसाचार झाला नसता. यामुळे यांच्या विरोधात, जीवघेणा हल्ला, दरोडा, सरकारी कामात अडथळा आणणे, गुन्हेगारी कारस्थान आणि दंगल करण्यासारख्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली येथील गाझीपूर पोलीस ठाण्यात राकेश टिकैत यांच्या विरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे कलम 307 अंतर्गतही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.1 फेब्रुवारी रोजी होणारा संसद मार्च रद्द -केंद्र सरकराने पारीत केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी 26 जानेवारीला आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण मिळाले. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. या हिंसाचाराचे पडसाद शेतकरी आंदोलनामध्ये उमटले आहे. ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने 1 फेब्रुवारीला होणारा संसद मार्च रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.