नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखत असल्याचा गंभीर आरोप शनिवारी 'जेएनयू'तील विद्यार्थी नेत्या शेहला रशीद यांनी केला. मात्र, नितीन गडकरींनी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर काही वेळातच शेहला रशीद यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले.शेहला रशीद यांनी शनिवारी यासंदर्भात ट्विट केले होते. या ट्विटमध्ये म्हटले होते की, संघ आणि गडकरी मोदींच्या हत्येचा कट आखत असल्याचे दिसतेय. मोदींची हत्या करून मुस्लीम किंवा कम्युनिस्टांवर बालंट आणायचे. त्यानंतर जमावाकडून मुस्लिमांच्या कत्तली करत सुटायचे, असा संघ आणि गडकरींचा डाव असल्याचे रशीद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यांच्या या ट्विटनंतर मोठी खळबळ उडाली होती. नितीन गडकरी यांनी या सगळ्याची गंभीर दखल घेत ट्विटरवरूनच शेहला रशीद यांना अप्रत्यक्षपणे कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. माझ्यावर पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचत असल्याचा आणि अद्वातद्वा बोलणाऱ्या समाजविघातक शक्तींविरोधात मी कायदेशीर कारवाई करेन, असे ट्विट गडकरींनी केले. बेछूट आरोप करणाऱ्यांना कायदेशीर धडा शिकवण्याचा गडकरींचा आजपर्यंतचा लौकिक पाहून शेहला रशीद यांनी काही वेळातच आपल्या विधानावरून माघार घेतली. मी हे विधान केवळ उपहासाने केले होते, अशा आशयाचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला केवळ एका उपहासात्मक ट्विटमुळे इतका राग येतो. मग विचार करा, प्रसारमाध्यांना हाताशी धरून उमर खालिदसारख्या निष्पाप विद्यार्थ्यांविरोधात मोहीम चालवण्यात आली, तेव्हा त्यांचे काय झाले असेल, असे शेहला रशीद यांनी सांगितले.
धक्कादायक! 'गडकरी आणि RSS आखताहेत मोदींच्या हत्येचा कट'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 8:53 AM