Lord Baahubali Munindra Panchkalyanak Mahotsav: जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या बाहुबली मुनींद्र भगवान यांचा पंचकल्याणक महोत्सव गुजरातमधील सोनगड येथे सुरू आहे. श्री आदिनाथ दिगंबर जिनबिंब पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाची सांगता २६ जानेवारी रोजी महामस्तकाभिषेकाने होणार आहे.
या भव्य आणि दिव्य सोहळ्याचे आयोजन सोनगडच्या श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्टने केलं असून विश्वस्त नेमिषभाई शाह हे महोत्सवाचे मुख्य निमंत्रक आहेत. पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात प्रतिष्ठाचार्य सुभाषभाई शेठ आणि बालब्रह्मचारी हेमंतभाई गांधी यांच्यासह त्यांचे सहकाऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने विधी केले. १९ जानेवारीपासून सुरू असलेल्या या महोत्सवात गर्भ कल्याणक, जन्मकल्याणक, तप कल्याणक, ज्ञान कल्याणक, मोक्ष कल्याणक असे विधी झाले असून, २६ जानेवारी रोजी नवीन प्रतिमांचे पूजन आणि महाअभिषेक असे विधी होणार आहेत. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, मनसुख मांडवीय यांनी विशेष हजेरी लावली.
५० फुटांचा पर्वत आणि ४१ फुटांची भगवान बाहुबली यांची प्रतिमा
श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्ट यांनी सोनगड येथे एका मोठ्या परिसरात ५० फुटी पर्वत तयार केला असून, यावर ४१ फुटांची भगवान बाहुबली यांची भव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे. या परिसरात नूतन जिनमंदिर निर्माण केले असून, यामध्ये सुमारे १४० प्रतिमांची स्थापना करण्यात येत आहे. या सोहळ्याला केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून जैन समुदायातील भाविकांनी उपस्थिती लावली. या विशेष सोहळ्याला १५ ते २० हजार जैन भक्तगण उपस्थित होते, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, या महोत्सवात भगवान महावीर यांच्या प्रतिमेवर शास्त्रशुद्ध पद्धतीने अभिषेक करण्यात आला. या सोहळ्याच्या निमित्ताने सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, शोभायात्रा, गुरूंचे प्रवचन अशा विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.