लखनऊ : समाजवादाचा मार्ग हाच खरा रामराज्याचा मार्ग आहे, असे समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी सोमवारी म्हटले. तसेच, भगवान कृष्ण (Lord Krishna) रोज रात्री स्वप्नात येतात आणि म्हणतात की समाजवादी सरकार (Samajwadi Govt) स्थापन होणार आहे, असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे.
भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नातही येतात आणि कालही आले होते, रोज येतात आणि म्हणतात की समाजवादी सरकार स्थापन होणार आहे, असे अखिलेश यादव म्हणाले. तसेच, भाजपाकडून सतत रामराज्याच्या गोष्टी सांगण्यात येतात. मात्र, समाजवादाचा मार्ग हाच खरा रामराज्याचा मार्ग आहे. ज्या दिवसापासून समाजवाद पूर्णपणे लागू होईल, त्या दिवसापासून रामराज्य सुरू होईल, असे अखिलेश यादव यांनी सांगितले.
अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपाने त्यांना मुख्यमंत्री केले ज्यांच्यावर सर्व गंभीर कलमांत गुन्हे दाखल आहेत. भाजपाचे अनेक नेते जे वयोवृद्ध आहेत, जे अनेक वर्षे रक्त आणि घाम गाळून पक्ष मजबूत करत होते, ते अनेकवेळा म्हणतात की, आम्ही रक्त सांडत होतो, ते कुठून आले माहीत नाही, त्यांना आमच्यावर बसवले गेले.
याचबरोबर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत अखिलेश यादव म्हणाले की, जेव्हा ते जनतेमध्ये जातील तेव्हा त्यांना विचारले जाईल की रोजगार आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासह सर्व आश्वासने का पूर्ण झाली नाहीत? प्रत्येकाला माहीत असेलच की जेव्हा मुलगा परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकत नाही, तेव्हा अनेकवेळा आई-वडील, काकाही कॉपी देण्यासाठी जातात. आमचे मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. आता त्यांना कोणीही उत्तीर्ण करू शकणार नाही आणि जे लोक उत्तीर्ण करण्यासाठी येत आहेत, तेही उत्तीर्ण करू शकणार नाही, असे अखिलेश यादव म्हणाले.
अखिलेश यादव यांनी स्वत: विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत सांगितले की, पार्टी सांगेल तिथून विधानसभा निवडणूक लढवणार आहे. तसेच, सरकार आल्यास घरगुती ग्राहकांना 300 युनिट मोफत वीज देण्याच्या आश्वासनाचा संदर्भ देत ते म्हणाले की, याचा सर्वाधिक फटका भाजपाला बसला आहे. 300 युनिट घरगुती वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे, कारण मागील सपा सरकारच्या कार्यकाळात वीज प्रकल्प उभारण्याचे अनेक प्रकल्प सुरू झाले होते, जे सध्याचे भाजपा सरकार पूर्ण करू शकले नाही, असे अखिलेश यादव म्हणाले.