आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या भाषणाच्या व्हिडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातच त्यांच्या भाषणाची एक व्हिडिओ क्लिप सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते भगवान श्रीकृष्ण आपले जावई असल्यचे सांगत आहेत. ते म्हणत आहेत की, भगवान श्रीकृष्ण हे आमचे जावई लागतात. कारण त्यांनी आसामची कन्या असलेल्या रुक्मिणीसोबत लग्न केले. यामुळे भगवान श्रीकृष्ण यांच्यासोबत आमचे जावयाचे नाते आहे.
आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवात पोहोचले होते हिमंता -मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 मध्ये बोलत होते. अनेक जण त्यांच्या या वक्तव्याला मथुरेसोबत जोडून बघत आहेत. याच वेळी, जेथे जेथे भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख होतो, तेथे तेथे आमची उपस्थिती असते, असेही हिमंता म्हणाले. महत्वाचे म्हणजे, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवात जवळपास 18 हजार मुलांनी सोबत गीता पठण केले. तसेच दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास 18 हजार मुलांनी एकाचवेळी अष्टादश श्लोकाचे पठण केले.
मोठ्या संख्येने लोक झाले होते सहभागी - हरियाणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव-2023 मध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात हिमंता बिस्वा सरमा यांच्याशिवाय, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर देखील उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी हजारो लोक ऑनलाईन उपस्थित होते. सीएम मनोहर लाल खट्टर म्हणाले, केवळ 'गीता जयंती'ने संस्कार येणार नाहीत, तर गीतेचा प्रत्येक श्लोक आचरणात आणावा लागेल.