हैदराबाद : वाराणसीहून इंदोरसाठी रविवारपासून काशी महाकाल एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. या ट्रेनमध्ये भगवान शंकरासाठी एक सीट कायमची आरक्षित ठेवण्यात आली असून त्या जागेला देव्हाऱ्यासारखे रुप देण्यात आले आहे. यावरून आता वाद उद्भवण्याची शक्यता आहे. खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. तसेच संविधानातील प्रस्तावनेचा विसर पडल्याचे म्हटले आहे.
काशी महाकाल एक्स्प्रेसला काल पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला. मात्र, या ट्रेनमध्ये बी 5 या डब्यामध्ये सीट क्रमांक 64 वर शंकराचे छोटे मंदीर सजविण्यात आले आहे. तसेच ही सीट भगवान शंकरांसाठी कायमची राखीव ठेवण्यात आली असल्याचेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावरून एमआयएमचे खासदार ओवेसी यांनी या ट्रेनमधील सीट देवासाठी आरक्षित करण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. यासाठी त्यांनी संविधानाचा आधार घेतला असून भारत एक समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक देश आहे. रेल्वेचे हे पाऊल संविधानाचा आत्मा असल्याचे सांगणाऱ्या प्रस्तावनेच्या विरोधात आहे, असे म्हटले आहे.
ओवेसी यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचा फोटोच ट्वीटरवर पोस्ट केला आहे. तर एएनआयने प्रसिद्ध केलेल्या फोटोमध्ये एक्स्प्रेसमधील या सीटवर लाल रंगाची चादर असून त्यावर ठेवलेल्या मंदिरात शंकराची मूर्ती ठेवण्यात आली आहे. ही ट्रेन 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.