नेत्यांच्या गदारोळामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा; अधिवेशनाच्या दर तासाला 1.5 कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 02:30 PM2023-07-25T14:30:34+5:302023-07-25T14:30:56+5:30
संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलै रोजी सुरू झाले असून, 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
Parliament Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून लोकसभा आणि राज्यसभेत मणिपूरचा मुद्दा गाजत आहे. दोन्ही सभागृहात नेत्यांचा गदारोळ ऐकायला-पाहायला मिळतोय. या गदारोळामुळे संसदेचे कामकाज सुरळीत चालत नाहीये. दरम्यान, संसदेचे अधिवेशन चालवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतो, त्यामुळे कामकाज होणे आणि सामान्यांचे प्रश्न मार्गी लागणे महत्वाचे आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अधिवेशनासाठी नेमका किती खर्च येतो? चला तर मग जाणून घेऊ...
संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू झाले असून, 11 ऑगस्टपर्यंच चालणार आहे. नेत्यांच्या गोंधळामुळे संसदेचा बराचसा वेळ वाया गेला असून कोणत्याही मुद्द्यावर व्यवस्थित चर्चा होऊ शकली नाही. संसदेचे कामकाज सकाळी 11 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत चालते. एक ते दोन वाजेपर्यंत जेवणाचा ब्रेक असतो, तर शनिवारी आणि रविवारी सुट्टी असते. अधिवेशनादरम्यान एखाद्या दिवशी सण आला तरीदेखील संसदेला सुट्टी असते.
प्रति तास किती खर्च येतो
रिपोर्ट्सनुसार, संसदेच्या प्रत्येक मिनिटाला अडीच लाख रुपये खर्च होतो. म्हणजे एका तासाला दीड कोटी रुपये खर्च होतोत. संसदेच्या अधिवेशनाच्या 7 तासांपैकी एक तास दुपारचे जेवण काढले तरी 6 तासांनुसार रोज 9 कोटी रुपये खर्च येतो. या 6 तासात नुसता गोंगाट आणि कोलाहल असेल, तर त्याला नुकसान नाही म्हणायचे तर आणखी काय म्हणणार? हा करदात्यांच्या पैशाचा अपव्यय आहे.
पैसा कुठे आणि कसा खर्च होतो?
तुम्हाला प्रश्न पडला असेल की, संसदेवर रोजचा 9 कोटींचा खर्च कसा होतो? हा खर्च खासदारांना मिळणाऱ्या पगार, भत्त्यांवर होतो. यामध्ये संसद सचिवालयावरील खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे. अनेक कर्मचारीही संसदेत काम करतात. त्यात त्यांचा पगारही जोडा. त्यामुळे या सर्व खर्चाची एका दिवसाची सरासरी कोट्यवधी रुपयांमध्ये जाते.