नवी दिल्ली- कोरोनाचं संक्रमण देशात वाढत असल्यानं रुग्णसुद्धा मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यातच काही रुग्णांमध्ये लक्षण नसतानाही त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोनाच्या नव्या लक्षणांचा यादीत समावेश केला आहे. गंध आणि चव घेण्याची क्षमता कमी झाल्यास तेसुद्धा आता कोरोनाचं लक्षण समजलं जाणार आहे. वास कमी येणे (एनोस्मिया) किंवा चव न लागणे (एग्यूसिया) हीसुद्धा कोरोनाची लक्षणं असल्याचं अधोरेखित केलं आहे. सध्या एखाद्याची कोरोना चाचणी घेण्यासंदर्भात 13 लक्षणं विचारात घेतली जातात, ज्यात मागील महिन्यातच सुधारणा करण्यात आली आहे.या लक्षणांमध्ये ताप, खोकला, अतिसार, उलट्या होणे, ओटीपोटात वेदना होणे, श्वास घेण्यात अडथळा येणे, शरीरात वेदना होणे, घसा खवखवणे, छातीत दुखणे आणि नाक वाहणे यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. यापैकी एक किंवा अधिक लक्षणे असलेल्या लोकांना कोरोना चाचणी घेण्यास परवानगी आहे. आता यादीमध्ये चव न लागणे आणि गंध न येणं ही लक्षणं जोडल्यानंतर आता चाचणी घेण्याच्या दृष्टीने 15 क्लिनिकल लक्षणं विचारात घेतली जाणार आहेत.
कोरोनाची दोन नवीन लक्षणं; आरोग्य मंत्रालयानं अपडेट केली यादी... जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 6:15 PM