बलवंत तक्षकलोकमत न्यूज नेटवर्कचंडीगड : निवडणूक हरलेल्या उमेदवाराचा भव्य जाहीर सत्कार झाल्याचे कधी पाहिले का? पराभूत करणाऱ्यांनीच नंतर त्याला जमीन, चारचाकी व लाखो रुपये देऊन गौरविल्याचे कधी ऐकले का? निश्चितपणे काेणीही नाहीच म्हणेल; परंतु अशी अनोखी घटना हरयाणात घडली. फतेहाबाद जिल्ह्यातील नाधोडी गावाने बंधुभावाचे हे आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.
सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उभे असलेले सुंदर कुमार एका मताने पराभूत झाले. त्यांना पराभवाचे शल्य वाटू नये म्हणून ग्रामस्थांनी त्यांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित करून त्यांना ११ लाख ११ हजार रुपये रोख, एक स्विफ्ट डिझायर कार व पाव एकर जमीन भेट म्हणून दिली.
गावकऱ्यांचा आदर्श नाधोडी गावात ७१ वर्षांनंतर प्रथमच अनुसूचित जातीचा सरपंच झाला आहे. या निवडणुकीत नरेंद्र एका मताच्या फरकाने विजयी झाले. नाधोडी गावात एकूण ५०८५ मते आहेत. यापैकी ४४१६ जणांनी मतदान केले. सुंदर कुमार यांना २२०० आणि नरेंद्र यांना २२०१ मते मिळाली. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही सुंदर यांचा जाहीर सत्कार करून गावकऱ्यांनी अनोखे उदाहरण समोर ठेवले आहे.