पाटणा : हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठी आई मंदिर-दर्गा सर्वत्र नवस करत होती. मुलाच्या शोधासाठी धावाधाव करीत होती, पण अचानक त्यांना एके दिवशी कळलं की आपल्या घरात गेले २0 दिवस जो मुलगा भाडेकरू म्हणून राहतो आहे, तो आपला स्वत:चाच मुलगा आहे. आई-आणि मुलाच्या पुनर्भेटीची ही घटना चित्रपटातील आहे, असे वाटेल, पण ती खरीखुरी आहे. बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील फुलबडिया येथील शबाना परवीन यांचा मुलगा २00९ साली गावातीलच जावळाच्या कार्यक्रमाला गेला असता तेथून अचानक गायब झाला. खूप शोधाशोध केली, पण तो सापडला नाही. पोलीस ठाण्यातही तक्रार केली. पोलिसांनी शोध घेतला, पण तो सापडेना. मुलगा परत मिळावा, यासाठी आईने अजमेरच्या मोईनुद्दिन चिस्तीच्या दर्ग्यापासून मुंबईतील हाजीअली दर्ग्यापर्य$ंत नवस केले, पण त्यातूनही काही निष्पन्न झाले आहे. अखेर ६ वर्षांनी तो त्यांना स्वत:च्या ७ जानेवारी रोजी घरातच सापडला. शबाना परवीन यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या रिक्षावाल्याला बरौनी येथे एक मुलगा भटकताना दिसला. त्याने या मुलाची चौकशी केली, तेव्हा त्याने आपले नाव राजू सांगितले. मला काही तरी काम द्या, असे तो म्हणाला. त्यावेळी रिक्षावाल्याला शबाना परवीन यांचा मुलगा हरवल्याची माहितीही नव्हती. त्यामुळे तो राजूला घेऊन घरी आला. अचानक आलेल्या या मुलाला परवीन यांनी पाहिले आणि हाच तो आपला मुलगा, अशी त्यांची खात्रीच पटली. राजू मात्र आईला ओळखू शकला नाही. आईने त्याला लहानपणीचा फोटोंचा आल्बम दाखवला, तेव्हा मात्र त्याचाही विश्वास बसला. जावळाच्या कार्यक्रमातून काही लोकांनी राजूला बळजबरीने उचलून नेले होते. इन्जेक्शन आणि औषधे देऊन त्याला एका ठिकाणी ठेवण्यात आले. अपहरण करणाऱ्याने तू माझाच मुलगा आहे, असे त्याला सांगितले. अगदीच लहान असल्याने त्याला काही कळत नव्हते, पण तो मोठा झाला आणि तोपर्यंत त्या दाम्पत्यालाच आपले पालक मानू लगला. एकदा घराबाहेर खेळत असताना एका मित्राने त्याला सांगितले की, त्याचे आई-वडील खोटे बोलत आहेत. त्याला इथे पळवून आणण्यात आले होते. हे कळताच राजूने तेथून पळ काढला. आपले घर रेल्वे स्थानकाजवळ आहे, याखेरीज त्याला काहीच आठवत नव्हतं. त्यामुळे त्याने वाराणसी, अलाहाबाद, देवरियासह अनेक स्थानकांवर रात्र घालवली, पण त्याला स्वत:चे घर सापडले नाही. पोट भरण्यासाठी तो कोणत्याही हॉटेल, ढाबा वा चहाच्या दुकानात काम करायचा आणि काही दिवसांनी पुन्हा घराच्या शोधात निघायचा. असे करता करता एके दिवशी तो बरौनी गावात आला. तिथेच त्याची अरमान या रिक्षावाल्याशी गाठ पडली त्याच्यासोबतच राजू स्वत:च्याच आईच्या घरात राहायला लागला. मात्र घरामध्ये आणि परिसरामध्ये बरेच बदल झाले असल्याने त्याला ते लक्षातही आले नाही. पोलीस अधीक्षक रंजीत कुमार मिश्र यांनी २00९ मध्ये बेपत्ता झालेला राजू सापडला असल्याचे सांगितले. राजूला आता न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तो लवकरच अधिकृतपणे स्वत:च्या घरात परवीन यांचा मुलगा म्हणून राहू लागेल.
हरवलेला मुलगा चुकून आला स्वत:च्याच घरात राहायला
By admin | Published: February 08, 2017 1:30 AM