सोनपत : भारतीय कु्स्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या सात महिला कुस्तीपटूंपैकी एका अल्पवयीन मुलीने दबावाखाली तिचे विधान बदलले आहे. जबाब बदलण्यासाठी तिच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला. एवढेच नव्हे, तर तडजोड करण्यासाठी आमच्यावरही प्रचंड दबाव टाकला जात असल्याचा दावा कुस्तीपटू साक्षी मलिकने केला.
महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात सोनिपत येथे महापंचायतीचे आयोजन करण्यात आले. महापंचायतीत बजरंग पुनिया, साक्षी मलिक सहभागी होते. तडजोडीसाठी आमच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप साक्षीने केला.
‘सरकारला १५ जूनपर्यंत मुदत’
ब्रिजभूषण यांना अटक होईपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील. आम्ही आंदोलनातून माघार घेतलेली नाही. सरकारने १५ जूनपर्यंत कारवाई करावी, अन्यथा पुन्हा आंदोलनाला बसावे लागेल, असा इशारा कुस्तीपटू बजरंग पुनियाने दिला.
...तरच एशियन गेम्समध्ये सहभागी होणार
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार प्रकरण निकाली निघाले, तरच आम्ही एशियन गेम्समध्ये सहभागी होऊ, असा इशारा साक्षी मलिकने दिला. आम्हाला किती मानसिक त्रास होतोय, याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे हे प्रकरण निकाली निघाले, तरच स्पर्धेत सहभागी होऊ. सप्टेंबरमध्ये चीनमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे.
भारताला मोठा फटका?
लैंगिक अत्याचार प्रकरणावर तोडगा न निघाल्यास आणि कुस्तीपटूंनी एशियन गेम्समधून माघार घेतल्यास या स्पर्धेत भारताला मोठा फटका बसू शकतो. गतवेळच्या स्पर्धेत बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांनी सुवर्णपदक पटकावले होते.