नवी दिल्ली - महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवत शिवसेनेने आपला जुना मित्रपक्ष असलेल्या भाजपला डावलून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. याचे पडसाद देशातील इतर राज्यातही उमटण्याची शक्यता आहे. याचेच पडसाद बिहारमध्ये उमटण्याची शक्यता असून कमळ अडचणीत येणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंह यांनी दावा केला की, महाराष्ट्रातील राजकारणाचा साईड इफेक्ट बिहारच्या राजकारणावर होऊ शकतो. लवकरच बिहारमध्ये राजकीय भूकंप होईल. त्याचे कारण म्हणजे जेडीयू आणि आरजेडी यांच्यात सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरू झाली आहे. तसेच जेडीयूला आमच्यासोबत येण्यास काही अडचण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याआधी रधुवंश सिंह यांनी असाच दावा केला होता. भारतीय जनता पक्ष नितीश कुमार यांचं अस्तित्व संपविण्यासाठी प्रयत्नशील असून त्यामुळे राजद सोबत जाण्यास नितीश यांची हरकत नाही, असंही त्यांनी नमूद केले होते.
2015 मध्ये नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्यासोबत निवडणूक लढवली होती. त्यावेळी राजद-जदयूने सत्ता देखील स्थापन केली होती. मात्र नितीश कुमार यांनी 2017 मध्ये भाजपसोबत जात सरकार स्थापन केले. आता महाराष्ट्रातील घडामोडींमुळे बिहारचे राजकारण तापले आहे. पुढील वर्षी बिहारमध्ये निवडणूक होणार आहे. देशातील बदलेली स्थिती पाहता जदयू-राजद सोबत येऊ शकतात चर्चांना उधाण आले आहे.