पासपोर्टवर लवकरच दिसणार कमळाचं चिन्ह; परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 11:11 PM2019-12-12T23:11:52+5:302019-12-12T23:12:21+5:30

संसदेत मोठा गदारोळ झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण

Lotus On Passports As Part Of Security Features says Ministry of external affairs | पासपोर्टवर लवकरच दिसणार कमळाचं चिन्ह; परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं कारण

पासपोर्टवर लवकरच दिसणार कमळाचं चिन्ह; परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं कारण

googlenewsNext

नवी दिल्ली: भारतीय पासपोर्टवरील कमळाच्या चिन्ह्याचा मुद्दा संसदेत गाजला. विरोधकांनी यावरुन मोदी सरकारला धारेवर धरलं. यानंतर आज परराष्ट्र मंत्रालयानं याबद्दल स्पष्टीकरण दिलं. सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली. कालांतरानं देशाच्या इतर प्रतिकांचाही पासपोर्टवर वापर करण्यात येईल, असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. 

केरळमधील कोझिकोडमध्ये काही जणांना कमळाचं चिन्ह असलेली पासपोर्ट्स मिळाल्याचा मुद्दा काँग्रेस खासदार एम. के. राघवन यांनी लोकसभेत शून्य प्रहरात उपस्थित केला. एका वृत्तपत्रानं याबद्दलचं वृत्त दिल्याचं त्यांनी सभागृहाला सांगितलं. सरकारी संस्थांचं भगवाकरण करण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 

लोकसभेत पासपोर्टचा मुद्दा गाजल्यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार पत्रकार परिषदेत याबद्दल स्पष्टीकरण दिलं. कमळ आपलं राष्ट्रीय फूल आहे. पासपोर्टवर कमळाचं चिन्ह लावल्यामुळे बोगस पासपोर्ट लगेच ओळखता येतील. कमळाच्या फुलाचं चिन्ह पासपोर्टच्या सुरक्षेसाठी वापरलं जाईल, असं कुमार यांनी सांगितलं. 

आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या (आयसीएओ) सूचनांवरुन पासपोर्ट आणखी सुरक्षित करण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून कमळाचं चिन्ह वापरण्यात येत असल्याचंदेखील कुमार म्हणाले. कमळासोबतच देशाच्या अन्य प्रतिकांचादेखील टप्प्याटप्प्यानं वापर केला जाईल. सध्या पासपोर्टवर कमळाचं चिन्ह आहे. पुढील महिन्यात एखादं दुसरं चिन्ह असेल. भारताशी संबंधित प्रतिकांचा वापर पासपोर्टवर केला जाईल, असं रवीश कुमार यांनी स्पष्ट केलं.  
 

Web Title: Lotus On Passports As Part Of Security Features says Ministry of external affairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.