जैसलमेर - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्यावेळी सट्टेबाजांचा अंदाज, विश्लेषण साफ चुकले होते. गुजरात विधानसभा निवडणुकीतही असाच फटका बसू नये यासाठी सट्टेबाज प्रचंड काळजी घेत आहेत. राजस्थानातील फालोडी आणि बिकानेर येथील सट्टाबाजारातील बुकिंनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत गुजरात निवडणुकीवरील सट्टा लावण्याचे प्रमाण 25 टक्क्यांनी घटले आहे. फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. उत्तर प्रदेशात भाजपा 192 ते 200 जागा जिंकेल असा बुकिंचा अंदाज होता.
पण प्रत्यक्षात भाजापाने 235 जागा जिंकल्या. गुजरात निवडणुकीवर काही हजारांमध्ये सट्टा खेळला जात आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीच्यावेळी लोक लाखांमध्ये सट्टा खेळले होते असे एका बुकिने सांगितले. उत्तर प्रदेशचा निकाल चुकल्यामुळे बुकिंना कोटयावधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते.
गुजरात निवडणुकीसंबंधी सट्टाबाजाराने भाजपाच्या बाजूने कौल दिला आहे. भाजपा निवडणूक जिंकेल पण जागांमध्ये घट होईल असे सट्टाबाजाराचा अंदाज आहे. गुजरातमध्ये भाजपा 107 ते 110 तर काँग्रेसला 70 ते 72 जागा मिळतील असा सट्टाबाजाराचा कौल आहे. गुजरात विधानसभेमध्ये 182 जागा असून 2012 मध्ये भाजपाने 115 जागा आणि काँग्रसने 68 जागा जिंकल्या होत्या. भाजपाच्या विजयासाठी 50 पैशांचा तर काँग्रेसला 2 रुपयांचा भाव दिला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींच्या सभांनंतर जसे वातावरण बदलत जाईल तसा हा भाव सुद्धा चेंज होईल. बुकिंना गुजरातच्या निवडणुकीमध्ये जितका रस आहे तितका हिमाचल प्रदेशच्या निकालामध्ये नाहीय. गुजरातचा निकाल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संबंधित आहे. भारतात सट्टेबाजी बेकायदा असली तरी महत्वाच्या घटनांवर मोठया प्रमाणात सट्टा खेळला जातो. क्रिकेट सामने, निवडणूका आणि पावसाची तारीख यावर भारतात सट्टेबाजी चालते. निवडणूक विश्लेषक, मीडिया यांच्याप्रमाणे सट्टेबाजांकडेही संभाव्य निकाल काय लागू शकतात याबद्दल चांगली माहिती असते. मुंबई आणि गुजरातमधील सट्टेबाजांनुसार गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर 1 हजार कोटींचा सट्टा लागला आहे.