लखनौ - अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठाच्या (Allahabad Central University) कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव (Vice Chancellor Prof Sangeeta Srivastava) यांनी अजानमुळे झोपेत अडथळा निर्माण होतो अशी तक्रार केली होती. त्यांनी याबाबत थेट जिल्हाधिकारी भानू चंद्र गोस्वामी यांना पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये श्रीवास्तव यांनी नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर आता प्रयागराज येथील सिव्हील लाईन येथे लाल मशिदीवर असलेल्या लाऊडस्पीकरची दिशा बदलण्यात आली आहे. तर, दुसरीकडे प्रयागराज येथेही न्यायालयाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे.
कुठल्याही सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपणास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशानुसार प्रयागराज पोलिसांनीही ध्वनीक्षेपणाला निर्बंध घातले आहेत. येथील आयजी केपी सिंह यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आदेश सर्वांना दिले आहेत. केपी. सिंह यांनी विभागातील सर्वच प्रयागराज, प्रतापगढ, कौशांबी व फतेहपूर या जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना यांसदर्भात पत्र दिले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे सक्तीने पालन करण्यात यावे, तसेच रात्री ते सकाळी 6 वाजेपर्यंत ध्वनी क्षेपणास परवानगी देऊ नये. तसे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असे या पत्रात नमूद केले आहे.
कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव यांच्या तक्रारीनंतर हे पत्र जारी करण्यात आलं आहे. कुलगुरुंच्या तक्रारीनंतर मशिदीनेही लाऊडस्पीकरची दिशी बदलली आहे. तसेच, "आम्ही सकाळी वृत्तपत्र पाहिलं तेव्हा आम्हाला या आवाजानं कोणाला त्रास होतोय हे वाचून अतिशय दु:ख झालं. त्यानंतर आम्ही सर्वांनी चर्चा करून निर्णय घेतला. कोणाला त्रास होत असताना आपण करत असलेली सेवा देणं योग्य नाही. त्यामुळे आम्ही कुलगुरूंच्या घराकडे असलेल्या लाऊडस्पीकरची दिशा बदलून रोडच्या दिशेनं केली आहे," असं मशिदीत असलेले मोहम्मद कलिम यांनी आजतकशी बोलताना सांगितलं. "पाच वेळा अजान होते. या ठिकाणी सुरुवातीपासूनच लाऊडस्पीकर लावण्यात आले होते. दोन हॉर्नची परवानगीदेखील आहे. परंतु काही दिवसांपूर्वी पोलीस या ठिकाणी आले होते. त्यानं इथे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा असल्याचं सांगत यामुळे लोकांना समस्या होत असल्याचं म्हटलं होतं. यानंतर लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला," असंही त्यांनी सांगितलं.